
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : शहरातील एकोडी रोड चौक परिसरात दिवसाढवळ्या स्कुटीची डिक्की तोडून सोन्याची अंगठी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मोटारसायकलवर आलेल्या चोरट्यांनी काही क्षणांत डाव साधत पळ काढला.
प्राप्त माहितीनुसार, ग्राम बामपेवाडा येथील ७० वर्षीय तानबाकाशीराम चांदेवार यांनी बीडीसीसी बँकेत गहाण ठेवलेली सुमारे पाच ग्रॅम सोन्याची अंगठी त्या दिवशीच सोडवली होती. अंगठी बॅगेत ठेवून ती स्कुटीच्या डिक्कीत ठेवण्यात आली होती. दुपारी साडेएकच्या सुमारास ते एकोडी रोड चौकातील ‘ओम किराणा’ दुकानात खरेदीसाठी गेले असता स्कुटी रस्त्यावर उभी होती. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी स्कुटी क्रमांक एमएच-३६टी-९५५० ची डिक्की फोडून बॅग पळवली. घटनेदरम्यान एका लहान मुलाने संपूर्ण प्रकार पाहून आरडाओरडा केला; मात्र तोपर्यंत चोरट्यांनी बॅगेतील सोन्याची अंगठी काढून बॅग रस्त्यावर फेकत मोटारसायकलवरून पलायन केले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा अशी चोरी होत असल्याने गुन्हेगारांचा वाढता धाडस स्पष्ट होत आहे.
फिर्यादी तानबा चांदेवार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मात्र, शहरात अलीकडच्या काळात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही व्यवस्था मजबूत करणे, पोलिसांची गस्त वाढवणे आणि नागरिकांनीही वाहनांमध्ये मौल्यवान वस्तू न ठेवण्याबाबत दक्षता घेणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे.