
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : लाखनी नगर पंचायतीच्या कार्यालयात आज दि.२४ फेब्रुवारी २०२६ रोजी येथे विषय समिती सभापती पदांची निवडणूक प्रक्रिया शांततेत अविरोध पार पडली.यावेळी विविध समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांची अधिकृत घोषणा करण्यात आली. यामध्ये सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी संदीप दिगंबर भांडारकर यांची निवड करण्यात आली तर स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी राजेश उद्धवराव निंबेकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ. निशा संदीप मोहनकर तर उपसभापतीपदी श्रीमती कांता रविंद्र निर्वाण यांची निवड करण्यात आली.
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे पदसिद्ध सभापती म्हणून उपाध्यक्षा सौ. लता रमेश रोडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विशेष सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी आशिष घोडे यांनी काम पाहिले. त्यांना कार्यालयीन अधीक्षक कु. अंजली बारसागडे, प्रशासकीय अधिकारी लोकेश कटरे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी नगरपंचायतीच्या अध्यक्षा सौ. त्रिवेणी मनोज पोहरकर यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण पार पडल्याची माहिती मुख्याधिकारी आशिष घोडे यांनी दिली.