
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पालांदूर : कन्हाळगाव शेतशिवारात चूलबंद नदीपात्रातून अवैधरीत्या रेतीची वाहतूक करताना एक ट्रॅक्टर ट्रॉलीसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गस्तीदरम्यान पकडला. ही कारवाई १६ जुन रोजी सकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत चालक व मालक अशा दोन आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर ७ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे साकोली उप विभागीय पथकातील पोलीस हवालदार सुनील ठवकर ,दोनोडे, भानारकर हे पोलीस ठाणे पालांदूर हद्दीत गस्तीवर ‘आॅल आउट आॅपरेशन’ राबवित असताना चूलबंद नदीपात्रातून रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करीत असलेला विना क्रमांकाचा निळ्या रंगाचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर तसेच विना क्रमांकाची लाल रंगाची ट्रॉली मिळून आली.
ट्रॅक्टरचालक प्रकाश श्रावण रामटेके (३६, रा. मूरमाडी, ता. लाखनी) व ट्रॅक्टरमालक राजू तुकाराम शेंडे (रा. शिवणी/मोगरा, ता. लाखनी) यांना रेतीच्या परवान्याबाबत विचारणा केली. मात्र,त्यांच्याकडे रेती वाहतुकीचा परवाना नसल्याचे आढळून आले. पालांदूर पोलिसांनी विना क्रमांकाचा ट्रॅक्टर व विनाक्रमांकाच्या ट्रॉलीसह चालक मालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध भा. न्या.सं.३०५ (ई), सहकलम ४९ या कलमान्वये गुन्हा क्र.१६३/२०२६ दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार विलास मुंढे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.