
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : महाशिवरात्री निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही तुमसर येथील श्री गायमुख देवस्थान येथे भव्य यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यावर्षी हजारो भाविकांनी उपस्थिती लावून दर्शनाचा लाभ घेतला. संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाने केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे यात्रा अत्यंत सुव्यवस्थित आणि सुरक्षित वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली. मंदिर परिसरात प्रवेशासाठी विस्तृत मार्ग, प्रशस्त दर्शनरांग आणि गर्दी नियंत्रणासाठी काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या होत्या. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी यात्रा समिती व प्रशासनाने दिवस-रात्र मेहनत घेतली. परिणामी संपूर्ण परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध दिसून आला.