
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : तलावावर बैल धुण्यासाठी गेलेल्या शेतकºयाचा एका बैलासह तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता सुमारास गोंदिया तालुक्यातील खातिया येथे घडली. महेंद्र बाबुराव कवरे (वय ४७) रा. खातिया असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या शेतकºयाचे नाव आहे. रावणवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खातिया येथील शेतकरी महेंद्र कवरे हे शनिवारी दुपारी गावापासून काही अंतरावर असलेल्या माता मंदिर तलाव येथे बैलांना धुण्यासाठी घेऊन गेले होते. बैलांना धुतल्यानंतर त्यांना बैलबंडीला जुंपून बाहेर काढत असताना बैलबंडीचा तोल गेल्याने महेश कवरे हे बैलबंडीसह तलावात बुडाले. ज्या भागातून महेश कवरे यांनी बैलबंडी पलटविण्याचा प्रयत्न केला त्याच भागात खोल खड्डा असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. परिणामी महेश कवरे यांचा व त्यांच्या एका बैलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. हीघटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती रावणवाडी पोलिसांनी दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. महेश कवरे यांच्या पश्चात वडील, पत्नी व तीन मुली आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे.