
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : आयुष्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली स्वप्नाळू, जिद्दी आणि कर्तृत्ववान तरुणी, डोळ्यांत पोलीस होण्याचे स्वप्न, मनात कुटुंबासाठी काहीतरी मोठं करण्याची उमेद, मात्र नियतीच्या एका क्रूर वळणाने सगळंच हिरावून नेलं. अर्जुनी मोर तालुक्यातील मोरगाव येथे १९ वर्षीय पायल वामन शहारे हिचा ईटियाडोह कालव्यात बुडून झालेला मृत्यू संपूर्ण परिसराला हळहळ लावून गेला आहे. सोमवारी (३० मार्च) सकाळी सुमारे आठ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरकामासाठी पायल कालव्याकाठी गेली होती. सध्या रब्बी हंगामामुळे कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले असून तो दुथळी भरून वाहत होता. अशा वेळी कपडे धुताना तिचा पाय घसरला आणि क्षणार्धात ती खोल पाण्यात कोसळली.
वेगवान प्रवाहाने तिला ओढून नेले आणि काही क्षणांतच ती नजरेआड झाली. घटनेची बातमी वाºयासारखी पसरताच गावात एकच खळबळ उडाली. नातेवाईक, ग्रामस्थ, पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी धावले. सुमारे २० फूट खोल पाण्यामुळे शोधकार्य अत्यंत कठीण बनले होते. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन ईटियाडोह सिंचन विभागाशी संपर्क साधून कालव्याचे पाणी बंद करण्यात आले. तरीही आशेचा धागा पकडून शोधमोहीम अखंड सुरू ठेवण्यात आली. तब्बल २४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आज ३१ मार्च रोजी मंगळवारी सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान पायलचा मृतदेह घटनास्थळापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर आढळून आला.
हा क्षण हृदय पिळवटून टाकणारा होता. कुटुंबीयांचा आक्रोश, आई-वडिलांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि गावकºयांच्या चेहºयावर उमटलेले दु:ख, सगळं वातावरण स्तब्ध झालं होतं. पायल ही केवळ एक मुलगी नव्हती, तर कुटुंबाचा आधारस्तंभ आणि गावाचा अभिमान होती. अत्यंत बुद्धिमान, मेहनती आणि शिस्तप्रिय म्हणून तिची ओळख होती. पोलीस दलात भरती होऊन समाजसेवा करण्याचे तिचे मोठे स्वप्न होते. त्यासाठी ती नागपूर येथे जाऊन अभ्यास व शारीरिक तयारी करत होती. तिच्या जिद्दीने अनेक तरुणींना प्रेरणा मिळत होती. परंतु नियतीने तिच्या या स्वप्नांवर पाणी फेरले. ‘घरचा आधार, कुटुंबाची आशा आणि आमचा अभिमान असलेली मुलगी अशी अचानक निघून जाईल, यावर विश्वास बसत नाही,’ अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपली वेदना व्यक्त केली.