
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : गोपनीय माहितीच्या आधारे साकोली पोलिसांनी मोठी कारवाई करत कत्तलखान्याकडे पाठविण्यात येणाºया दहा गोवंशांना जीवनदान दिले. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक करत बोलेरो पिकअपसह अंदाजे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राप्त माहितीनुसार, साकोली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तालुक्यातील जांभळी भीवसेन टोला येथील निवासी आरोपी अजय जगदीश्वर ऊके (वय ४७) हा परिसरातील गावांतून गोवंश खरेदी करून नागपूर-कामठी येथील कत्तलखान्याकडे विक्रीसाठी पाठविण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत घटनास्थळी छापा टाकला. यावेळी दहा गोवंश व बोलेरो पिकअप (क्रमांक एमएच ३६- एए१२८५) ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत अंदाजे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी अजय ऊके याला अटक करण्यात आली आहे. ही संपूर्ण कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत वडूले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन बेडवाल, पोलीस नायक नरेंद्र झलके, राहुल गायधनी व सचिन राऊत यांच्या पथकाने पार पाडली.