
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी : रेल्वे रुळाच्या बाजूला स्वच्छता करून मजुरांनी लावलेली आग शेजारच्या शेतात पोहोचली आणि धानाचे १३० पोते, एक ट्रॅक्टर जळून कोळसा झाले. डोळ्या देखत झालेली स्वप्नांची राख रांगोळी पाहून शेतकरीही गर्भगळीत झाला. बिरबल गोटेफोडे असे या आभागी शेतकºयाचे नाव आहे.या आगीत जवळपास १२ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. बिरबल गोटेफोडे रा. नरसिंगटोला (देव्हाडा बु.) ता. मोहाडी जि.भंडारा असे नुकसानग्रस्त शेतकºयाचे नाव आहे. बिरबल यांच्या शेताच्या शेजारून रेल्वे रूळ जातात. रेल्वे रूळ परिसरात आज २७ रोजी रेल्वेच्या मजुरांनी स्वच्छता केली. निघालेला कचरा त्यांनी दुपारच्या सुमारास जाळला. कडाक्याचे ऊन्ह आणि वारा यामुळे ही आग पसरत गेली आणि शेजारी असलेल्या बिरबल यांच्या शेतात पोहचली. त्यांच्या शेतात मळणी करून ठेवलेले २०० हून अधिक धानाचे पोते रचून ठेवले होते.
या शेजारी एक ट्रॅक्टर पण उभा होता. पसरलेल्या आगीने धानाच्या पोत्यांना आणि ट्रॅक्टरला आपल्या कवेत घेतले. हा प्रकार लक्षात येऊन मदत कार्य सुरू होईपर्यंत धानाचे १३० पोते जळून खाक झाले होते. ट्रॅक्टर ही या अग्निकांडात पूर्णपणे जळाले. घटनेची माहिती मिळताच शेतकरी आणि गावकरी शेतात पोहोचले. याचवेळी तुमसर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाची मदत घेण्यात आली. अग्निशमन विभागाच्या गाडीने येऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत जवळपास १२ लाखाचे नुकसान शेतकºयाचे झाले होते. उद्या विक्री करून, पैसे येतील अशी स्वप्न पाहणाºया शेतकºयाला डोळ्यादेखत त्याच्या कष्टाची राख रांगोळी होताना पहावी लागली. यावेळी शेतकरी पूर्णपणे हतबल दिसत होता. रेल्वे मधुरांच्या निष्काळजीपणामुळे एका शेतकºयावर ओढविलेला हा प्रसंग वर्षभराच्या प्रपंचाला बाधित करणारा आहे.