
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी बेला : बेला येथे मैत्रीया फाउंडेशनच्या पुढाकाराने समता पर्वाचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा महेंद्र विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, बेला येथे मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित निबंध व कविता लेखन स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश थोर समाजसुधारकांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, त्यांच्या कायार्तून प्रेरणा घेऊन सामाजिक समतेचा संदेश दृढ करणे हा होता. ‘समता पर्व’ अंतर्गत भंडारा तालुक्यातील बेला, पिपरी (पुन:), फुलमोगरा आणि कवडसी येथील महेंद्र विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, सावित्रीबाई फुले विद्यालय, जिल्हा परिषद शाळा, लोकांची शाळा, माणिकराव सुखदेवे व शशांक विद्यालय येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. निबंध लेखनासाठी समाजसुधारकांचे कार्य, लोकशाही व समता, विज्ञानाचे महत्त्व आणि संविधानापुढील आव्हाने असे विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विचारपूर्ण व सामाजिक जाणिवा दर्शवणारे लेखन सादर केले, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गटशिक्षणाधिकारी राठोड सर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून रत्नमालाताई चेटुले, केंद्रप्रमुख फंदे सर, प्राचार्य सचिन गभणे सर, स्थानिक शिक्षकवर्ग, पालक व मैत्रीया फाउंडेशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. २०१८ पासून कार्यरत असलेली मैत्री स्टडी सर्कल ही आता २०२५ पासून मैत्रीया फाउंडेशन या नावाने कार्यरत असून शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा देणे व सामाजिक बांधिलकी जोपासणे यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. सदर कार्यक्रमास शिक्षक, प्राचार्य, स्थानिक अभ्यासक व विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि सकारात्मक वातावरणामुळे हा बक्षीस वितरण सोहळा अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला.