इंधन टंचाईमुळे तुमसर शहरामधील तीन पेट्रोल पंप बंद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : अमेरिका आणि इस्रायलने इराणसोबत पुकारलेल्या युद्धाचे जागतिक परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागले आहेत. या आंतरराष्ट्रीय युद्धाची थेट धग भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्याला बसली असून, इंधन तुटवड्यामुळे शहरातील महत्त्वाचे तीन पेट्रोल पंप बुधवारी, २५ मार्च रोजी सकाळपासून बंद पडले आहेत.

यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली असून शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. बुधवारी सकाळपासूनच तुमसर शहरातील तीन प्रमुख पेट्रोल पंपांवर ‘नो स्टॉक’चे फलक पाहायला मिळाले. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. याचाच परिणाम म्हणून स्थानिक स्तरावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. अचानक पेट्रोल पंप बंद झाल्याने कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि व्यावसायिक यांची मोठी फजिती झाली.

सकाळच्या वेळी अनेक नागरिक आपल्या वाहनांनी कामासाठी घराबाहेर पडले होते. मात्र, एकामागून एक पेट्रोल पंप बंद असल्याचे पाहून वाहनधारकांना रिकाम्या हाती परतावे लागले. जर हे युद्ध अधिक काळ लांबले, तर इंधनाचे दर गगनाला भिडण्याची आणि पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तुमसर शहरात याचे इतके तीव्र पडसाद उमटल्याने नागरिकांमध्ये इंधन साठवणुकीबाबत धास्ती निर्माण झाली आहे. प्रशासनाने या परिस्थितीवर लक्ष देऊन इंधनाचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *