
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पालांदूर: राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गौण खनिजाच्या अवैद्य उत्खनन व वाहतुकीबाबत गंभीर आहेत. लाखनी तालुक्यातील स्थानिक महसूल यंत्रणा मात्र सुस्त असल्याने डोंगरगाव भुगाव सोनमाळा या रेती घाटातून अवैद्य रेती उत्खनन आणि चोरटी वाहतूक जोमात सुरू आहे. सदर घाटातील रेती तस्करी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी भंडारा यांचे कार्यालयाच्या दि.१४/१०/ २०२५ च्या आदेशानुसार तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी लाखनी यांनी दि.३१/१०/ २०२५ ला मौजा सोनमाळा व भुगाव येथे गौन खनिज अवैद्य उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याकरिता स्थायी पथक स्थापन करण्याबाबत (चेक पोष्ट) कार्यान्वित करून सदर स्थायी पथकावर संयुक्तपणे महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी/ कर्मचारी यांची २४़७ आळीपाळीने नियुक्ती करण्याचे आदेशित केले आहे.
यास्तव अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज दिड महिन्यांचा कालावधी लोटूनही या स्थायी बैठे पथकाचा परफॉर्मन्स झिरो असल्याची माहिती आहे.त्यामुळे हे स्थायी बैठे पथक (चेक पोस्ट)पांढरा हत्ती ठरल्याची चर्चा महसूल वतुर्ळात रंगली आहे. लाखनी तालुक्यातील रेती तस्करी आता गुन्हेगारी वळणावर पोहोचली असल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे.रेती व्यवसायातील वर्चस्वातून ट्रॅक्टर विरुद्ध टिप्पर असे चित्र पहावयास मिळत असून अहोरात्र रेतीचे उत्खनन करून टिप्परद्वारे वाहतूक सर्रास सुरू आहे.अशा स्थितीत रेती तस्करीला रोक लावण्यात महसूल यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. लाखनी तालुक्यातील चूलबंद या प्रमुख नदीपात्रांतील डोंगरगाव सोनमाळा भुगाव या घाटावर रेती तस्करांनी ताबा केला आहे. शासनाची कुठलीही मान्यता नसतांना मालकी असल्याप्रमाणे रेती तस्कर रात्रंदिवस रेतीचा जेसीबी सारख्या अजस्त्र यंत्रांनी उपसा करून ट्रक,टिप्पर, ट्रॅक्टरने चोरटी वाहतूक करीत आहेत. स्थानिक स्तरावरील यंत्रणा कारवाई करीत नसल्याचे अनेकदा पुढे आले.
केवळ टार्गेटपुरत्या कारवाया करून महसुलातील कर्मचारी रेती तस्करीकडे अर्थपूर्ण संबंधातून दुर्लक्ष करीत आहेत.त्यामुळेच लाखनी तालुक्याच्या सोनमाळा व भूगाव येथे रेती उत्खनन व वाहतूक रोकण्यासाठी बैठे पथक (चेक पोस्ट)ची स्थापना करण्यात आली. सदर बैठे पथक (चेक पोस्ट) स्थापन होऊन तब्बल दीड संग्रहित छाया महिन्याचा कालावधी उलटला आहे.मात्र,यात नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी बºयाच वेळा कर्तव्यावर राहत नसल्याची ओरड आहे व परिसरातील बहुतांश नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत. परिणामी,या बैठेपथक (चेक पोस्ट) च्या माध्यमातून एकही धडाकेबाज कारवाई अद्याप करन्यात आलेली नाही.यावरून एकूणच रेती तस्करी रोकण्याचा हा केवळ दिखावा आणि पैशांची उधळपट्टी प्रशासन करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे सोनमाळा व भुगाव परिसरातील ट्रॅक्टर व टिप्परने रेती तस्करी करणाºया तस्करांत मोठा संघर्ष सुरू आहे. तस्करीत पूर्वाश्रमीचे गुन्हेगार, राजकीय पदाधिकारी या धंद्यात उतरले असल्याची माहिती आहे. यातील अनेक तस्करांनी चार ते पाच गावातील १० ते १५ ट्रॅक्टर भागिदारीने घेऊन साम्राज्य उभे केले असल्याची माहिती आहे. दुसºया तस्करांनी त्यांच्याजवळील ३ टिप्परांद्वारे एका पंधरवड्यात जवळपास ३०० ते ४०० ट्रिप रेतीचा डोंगरगाव सोनमाळा भुगाव सीमांकनातील नदीपात्रातून वाहतूक केल्याचे सांगण्यात येते.