
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : पूर्व विदर्भातील काशी म्हणून ओळखल्या जाणाºया प्रसिद्ध कुंभली येथील दुर्गाबाई डोह येथे मकर संक्रांती यात्रेच्या पार्श्वभूमीवर नियोजन व तयारीचा आढावा घेण्यासाठी आमदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली. यात्रेचे नियोजन, भाविकांच्या सोयीसुविधा, स्वच्छता, वाहतूक व सुरक्षा व्यवस्था याबाबत प्रशासन आणि ग्रामस्थांशी सखोल चर्चा करण्यात आली. मागील वषार्तील अनुभव लक्षात घेऊन यावर्षी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याच्या स्पष्ट सूचना आमदार नाना पटोले यांनी दिल्या.
यात्रा यशस्वी, सुरक्षित व भक्तिमय वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी करावी, असे निर्देश देताना भाविकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रकाशव्यवस्था, प्राथमिक आरोग्य सुविधा, आपत्कालीन सेवा तसेच वाहतूकनियोजन योग्य प्रकारे राबवण्यावर भर देण्यात आला. गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त, नियंत्रण कक्ष, स्वयंसेवकांची नेमणूक तसेच नदी व डोह परिसरात अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या. या आढावा बैठकीस साकोली तालुक्याचे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी निलेश कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वासेकर, पंचायत समिती सभापती ललित हेमने, ठाणेदार महादेव आचरेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेच्या काळात प्रशासन व स्थानिक नागरिकांनी समन्वयाने काम करून परंपरा, श्रद्धा व सुरक्षिततेचा संगम साधण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.