जि.प.तील विद्यार्थ्यांच्या नासा भेटीसाठी ३.३० कोटी!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक प्रवृत्ती जागृत करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनांमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त करणाºया विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी सुरू करण्याची संकल्पना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मांडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना केल्या. प्रस्ताव सादर होताच ‘ मुख्यमंत्री विज्ञानवारी’ ला मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थी, त्यांच्यासोबत असलेल्या समन्वयक, शिक्षक यांच्या प्रवास, व्हिसा, निवास व इतर खर्चासाठी ३ कोटी ३० लाख रुपयांच्या खर्चाला शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.

राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व गणित विषयाबाबत आवड निर्माण होण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर विज्ञान प्रदर्शने आयोजित केले जातात. या स्पर्धेमध्ये अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात येतो. परंतु, हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक त्या प्रमाणात प्रचलित नाही. विज्ञान व तंत्रज्ञानात विद्यार्थ्यांची रूची वाढविण्यासाठी या व्यासपीठाची व्याप्ती व महत्त्व वाढविणे आवश्यक आहे.

त्या अनुषंगाने विज्ञान प्रदर्शनांमध्ये पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना शासनाने नागपूर येथील रमण सायन्स सेंटर, बंगळुरू येथील इस्त्रो व अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील नासा या विज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठीत व मानबिंदू असलेल्या संस्थाना भेटी देण्यासाठी पुरस्कृत केल्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल, ही विज्ञान प्रदर्शने राज्यात अधिक व्यापक व प्रेरणादायी व्हावी, याकरिता तालुकास्तरावर निवड झालेल्या २१ विद्यार्थ्यांना रमण सायन्स सेंटर, जिल्हास्तरावरील उत्कृष्ट ५१ विद्यार्थ्यांना इस्त्रो तर राज्यस्तरावरील उत्कृष्ट ५१ विद्यार्थ्यांना थेट नासा केंद्राला भेट देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने प्रस्ताव मागवला होता. प्रस्ताव सादर केल्यानंतर मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारीला मंजुरी देण्यात आली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *