कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकºयाची आत्महत्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पालांदूर: लाखनी तालुक्यातील पळसगाव (कोलारी) येथील एका ४२ वर्षीय शेतकºयाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ९.३० वा. उघडकीस आली. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व आर्थिक विवंचनेतून ह्या शेतकºयाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत असून, पालांदूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. सत्येवान पंढरी वडीकार (वय ४२, रा. पळसगाव (को.) ता. लाखनी जि. भंडारा असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी पालांदूर पोलीसांनी मर्ग क्र. ०७/२०२६ कलम १९४ बी.एन. एस.अंतर्गत नोंद केली आहे. पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सत्येवान वडीकार हे शेती व्यवसाय करीत होते. शेती तसेच इतर कारणांसाठी त्यांनी खासगी संस्थांकडून कर्ज घेतले होते.

मात्र शेतीचे उत्पन्न समाधानकारक न झाल्याने कर्जफेड करणे कठीण झाले होते. कर्जफेडीसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी काही महिन्यांपूर्वी अर्धा एकर शेतीही विकल्याची माहिती समोर आली आहे.तरीदेखील कजार्चा बोझ कायम राहून कर्ज दिवसेंदिवस वाढतच असल्याने गेल्या काही दिवसांपासून सत्येवान मानसिक तणावात असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, सत्येवान वडीकार हे मानेगाव येथे सुरू असलेल्या हायवे रस्त्याच्या कामावर मजुरीसाठी जात होते. मंगळवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ते कामावर जात असल्याचे सांगून मोटारसायकलने घरातून निघाले; मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. नातेवाईकांनी गावासह परिसरात शोध घेतला, पण त्यांचा काहीच मागोवा लागला नाही. बुधवारी सकाळी पळसगाव शिवारातील विलास उध्दव सार्वे यांच्या शेताजवळ त्यांची मोटारसायकल आढळून आली. त्यानंतर परिसरात शोध घेतला असता शेतातील बांधाजवळ सत्येवान वडीकार मृतावस्थेत पडलेले दिसून आले. त्यांच्या तोंडातून औषधासारखा वास येत असल्याने विषारी द्रव्य प्राशन केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे पळसगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कर्जाच्या वाढत्या ओज्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी मानसिक तणावाखाली असल्याचे वास्तव पुन्हा समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार सतीश बन्सोड यांचे मार्गदर्शनात पो.हवा. समीर झलके करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *