भागडीत महिलेचा निर्घृण खून दिरानेच आवळला गळा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भागडी येथे एका ३० वर्षीय महिलेची तिच्याच नात्यातील दिराने उशीने तोंड दाबून आणि धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. माधुरी तुळशीदास अंबादे वय (३०) रा. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी संशयित आरोपी गौरव अंबादे (रा. ब्रह्मपुरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत माधुरी अंबादे ही संशयित आरोपी गौरव अंबादे आणि तिच्या चिमुरडीसह रविवारी दिनांक २६ एप्रिल रोजी रात्री पालांदूर येथील एका लग्नावरून परत येत होती. रात्री उशीर झाल्यामुळे त्यांनी भागडी येथील त्यांच्या नातेवाईक नाजूका युवराज गणवीर यांच्याकडे मुक्काम ठोकला.

रात्री सर्वजण जेवण करून झोपले असताना, पहाटे ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पहाटे ३ वाजेच्या सुमारास माधुरी यांची मुलगी जान्हवी हिच्या ओरडण्याचा आवाज आल्याने घरमालक नाजुका गणवीर यांना जाग आली. त्यांनी पाहिले असता, गौरव अंबादे हा घाईघाईत दुचाकीवरून पळून जात होता. जेव्हा नाजुका यांनी घरात जाऊन पाहिले, तेव्हा माधुरी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या गळ्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा होत्या, तर तिचे पाय स्कार्पने बांधलेले होते. चिमुरडीने सांगितला थरार माधुरी यांची मुलगी जान्हवी हिने दिलेल्या माहितीनुसार, तिला लघुशंकेसाठी जाग आली असता, ‘गौरव अंकल’ तिच्या मम्मीच्या तोंडावर उशी ठेवून तोंड दाबत होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि खळबळजनक वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच नाजुका गणवीर यांनी पतीसह पोलीस पाटील मंजुषा कुरंजेकर यांना गाठले आणि घटनेची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ लाखांदूर पोलीस स्टेशनला धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *