
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरातील एसटी विभागीय कार्यालयाच्या मागील बाजूस लागलेल्या वनव्याच्या आगीमुळे सोमवारी परिसरात काही काळ भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे या कार्यालयाच्या मागील बाजूस नागरिकांची वसाहत असल्याने स्थानिक रहिवाशांनी ही आग लवकरच लक्षात घेतली आणि एकच खळबळ उडाली. स्थानिकांच्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या दरम्यान या भागात आग लागल्याचे दिसून आले. सुरुवातीला लहान स्वरूपात असलेली आग परिसरातील कोरडे गवत, कचरा आणि झाडझुडपांमुळे हळूहळू वाढत गेली.
उष्ण वातावरण आणि वाºयाच्या झोतामुळे आगीने काही ठिकाणी वेगही घेतला, त्यामुळे जवळील वसाहतीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आग लागल्याचे लक्षात येताच काही नागरिकांनी स्वत:च्या परीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी संबंधित यंत्रणांना याची माहिती दिली. मात्र, संध्याकाळपासून रात्रीपर्यंत आग धुमसतच राहिल्याचे सांगितले जाते. दरम्यान, रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास भंडारा नगरपरिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ परिस्थितीचा आढावा घेत पाण्याचा मारा सुरू केला. काही काळाच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश मिळवले. जवानांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही प्रमाणात गवत व झाडझुडपांचे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नसून, निष्काळजीपणा की अन्य कारण याचा तपास संबंधित विभागाकडून सुरू असल्याचे समजते. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा उन्हाळ्यात वाढणाºया वनव्यांच्या घटनांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तसेच नागरिकांनीही कचरा जाळणे किंवा ज्वलनशील वस्तू टाकणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.