
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : विदर्भात सध्या उन्हाचा प्रकोप कमालीचा वाढला असून सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया यांसह अनेक जिल्ह्यांत तापमानाने ४३ ते ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिक घरातच थांबणे पसंत करत आहेत. उष्णतेमुळे शेतकरी, बांधकाम मजूर आणि बाहेर काम करणाºया लोकांना मोठा फटका बसत आहे. आरोग्य विभागाकडूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उष्माघाताचा धोका वाढल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदा मार्च महिन्याच्या दुसºया सप्ताहात भंडारा जिल्ह्यातील तापमानाने ४० अंश सेल्सिअसची पातळी ओलांडली होती. मात्र, मधल्या काळात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीठ यामुळे पारा खाली आल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातही पावसाची हजेरी असल्याने कमाल तापमान ३६ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मात्र, ११ एप्रिलपासून हवामानात वेगाने बदल झाला आणि उष्णतेची लाट सुरू झाली. ११ एप्रिल रोजी कमाल तापमान पुन्हा ४१ अंश सेल्सिअसवर गेले. त्यानंतर हा पारा सातत्याने वाढत गेला.
१६ एप्रिल रोजी कमाल तापमानाची तब्बल ४२ अंश सेल्सिअस अशी यंदाच्या हंगामातील उच्चांकी नोंद झाली. त्यानंतर काही दिवस हलकासा दिलासा मिळाला, मात्र पुन्हा तापमान वाढ सुरू झाली आणि २५ एप्रिल रोजी कमाल तापमानाचा पारा दुसºयांदा ४२.४ अंश सेल्सिअस असा नोंदवला गेला. रविवारी २६ एप्रिल रोजी ४३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले आहे. वाढत्या उष्मामुळे दिवसा शरीराची अक्षरश: काहीली होत आहे. विशेष म्हणजे, किमान तापमानात देखील वाढ झाली असून त्यामुळे रात्रीचा उकाडा देखील असह्य होऊ लागला आहे. तसेच दिवसासोबत रात्रीही नागरिक घामाघूम होत आहेत. काय काळजी घ्यावी? : दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ घ्यावेत, डोक्यावरटोपी/गमछा वापरावा, हलके व सैल कपडे परिधान करावेत, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.