
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यात वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (फळड), भंडारा यांच्या वतीने ‘रस्ता सुरक्षा रथा’ चे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. सतीश जाधव यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. रस्ते अपघातांची प्रमुख कारणे असलेल्या वेगमर्यादा ओलांडणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न करणे याबाबत नागरिकांना सजग करण्यासाठी या रथाच्या माध्यमातून दृकश्राव्य स्वरूपात माहिती देण्यात येणार आहे.
हा रस्ता सुरक्षा रथ भंडारा जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, मुख्य बाजारपेठा तसेच गर्दीच्या ठिकाणी जाऊन जनजागृती करणार आहे.उद्घाटनप्रसंगी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर उपस्थित होते. यावेळी मोटार वाहन निरीक्षक सुहास ठोंबरे, श्री. अमरसिंह चौथे तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सागर सराफ, गुलशनकुमार चावरे, अनिल ढोले, श्रीमती मेघाराणी काशिद यांच्यासह उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी व वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. सतीश जाधव यांनी ‘रस्ते सुरक्षा – जीवन रक्षा हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून स्वत:चे व आपल्या कुटुंबाचे जीवन सुरक्षित ठेवावे,’ असे आवाहन केले.