
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : राज्यातील ऊर्जा क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना अधिक सक्षम बनवण्यासाठी महावितरणने टाकलेले पाऊल आता यशस्वी होताना दिसत आहे. स्मार्ट वीज मीटरबाबत समाजात पसरलेले विविध गैरसमज आणि शंका दूर करत महावितरणच्या नागपूर परिमंडळाने एक नवा टप्पा गाठला आहे. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील तब्बल १३ हजार ६०४ शासकीय कार्यालयांनी आता ‘स्मार्ट’ कात टाकली असून, या बदलामुळे केवळ अचूक वीजबिलच नव्हे, तर वीज बचतीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनात मीटर रीडिंग न होणे, रीडिंगमध्ये होणाºया मानवी चुका किंवा सरासरी वीजबिल मिळणे यांबाबत तक्रारी असायच्या. मात्र, आता बसवण्यात आलेले ‘स्मार्ट मीटर’ पूर्णत: स्वयंचलित आहेत.
यामध्ये कोणत्याही मानवी हस्तक्षेपाची गरज नसल्याने ‘मानवी चूक’ होण्याची शक्यताच उरलेली नाही. नागपूर परिमंडळातील १३ हजार ६०४ शासकीय कार्यालयांमध्ये हे मीटर बसवल्यानंतर तक्रारींचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले असल्याचे चित्र समोर आले आहे. २१ जानेवारी २०२६ पर्यंत नागपूर जिल्ह्यातील १० हजार ३९९ आणि वर्धा जिल्ह्यातील ३ हजार २०५ अशा एकूण १३,६०४ शासकीय कार्यालयांचे वीज मीटर ‘स्मार्ट’ करण्यात आले आहेत. यामीटरमुळे मीटर रीडिंग न होणे किंवा सरासरी वीजबिल येणे अशा जुन्या तक्रारी आता इतिहासजमा होणार आहेत. स्मार्ट मीटरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे मीटर महावितरणच्या मोबाईल अॅपशी जोडलेले आहेत. ग्राहकांना आता दर तासाला आपण किती वीज वापरली, याची माहिती घरबसल्या मोबाईलवर पाहता येणार आहे. कोणत्या उपकरणांमुळे वीज जास्त खर्च होत आहे, हे समजल्यामुळे ग्राहकांना आपल्या वापरावर नियंत्रण ठेवता येईल. यामुळे ‘वापरानुसार बिल’ ही संकल्पना प्रत्यक्षात येईल आणि वीज बचतीची सवय लागून ग्राहकांचे आर्थिक नियोजन अधिक सोपे होणार आहे.
सध्या नागपूर परिमंडळात टप्प्याटप्प्याने हे काम सुरू असून सुरुवातीला शासकीय कार्यालये, महावितरणची स्वत:ची कार्यालये, शासकीय निवासस्थाने आणि मोबाईल टॉवर्सना प्राधान्य दिले जात आहे. तसेच नवीन वीज जोडणी घेणाºया ग्राहकांनाही स्मार्ट मीटरच दिले जात असून ‘सोलर नेट मीटरिंग’ साठी देखील याचा मोठाउपयोग होत आहे. शासकीय कार्यालयांसोबतच नागपूर जिल्ह्यातील २ हजार ८०५ आणि वर्धा जिल्ह्यातील ६२५ अशा एकूण ३ हजार ४३० मोबाईल टॉवर्सला स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.