
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : सध्या लग्नसराईचा हंगाम आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवरील व्हॉट्सअॅपवर निमंत्रणे येण्याचे प्रमाण वाढले आहे. याच संधीचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा फंडा शोधला आहे. निमंत्रण पत्रिकेच्या नावाखाली व्हॉट्सअॅपवर ‘एपीके’ फाईल पाठवून ती उघडताच संबंधित व्यक्तीचा मोबाईल हॅक होण्याचे प्रमाण वाढत आहे. धाडीवाल लेआऊट, पार्वतीनगर येथील रहिवासी राजीव दीपक सौदागर यांच्या सोबत असाच प्रकार अलिकडेच घडला. लग्नाची निमंत्रण पत्रिका उघडताच सौदागर यांचा भ्रमणदूरध्वनी सायबर गुन्हेगारांनी हॅक केला. त्यांच्या संपर्क यादीतील अनेकांना विवाहाच्या निमंत्रणाची धोकादायक फाईल पाठवण्यात आली. ज्यांनी ही फाईल उघडली, त्यांचे मोबाईल त्वरित हँग झाले. धक्कादायक म्हणजे, एकदा ही फाईल मोबाईलमध्ये सक्रिय झाली की, भ्रमणदूरध्वनीचे संपूर्ण नियंत्रण हॅकर्सच्या ताब्यात जाते. यातून नागरिकांची खासगी माहिती, बँक तपशील आणि इतर संवेदनशील डेटा चोरीला जाण्याचा धोका वाढला आहे.