
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नगर परिषद हद्दीतील खास भंडारा येथील रामनगर परिसरात मंजूर लेआउटमधील आरक्षित खुल्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नागरिकांनी जिल्हा प्रशासन व नगर परिषदेकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा खास येथील रामनगर लेआउट हा मा. अपर जिल्हाधिकारी, भंडारा यांच्या आदेशानुसार १८ मार्च १९९४ रोजी मंजूर करण्यात आला होता.
या लेआउटमध्ये सुमारे ३७२९.५० चौ.मी. क्षेत्रफळाची खुली जागा स्पष्टपणे दर्शविण्यात आली आहे. ही जागा नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी राखीव असून त्यावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मनाई आहे. मात्र लेआउट विकासक व संबंधित व्यक्तींनी मंजूर नकाशाचे उल्लंघन करत खुल्या जागेवर बेकायदेशीर प्लॉटिंग करून विक्री केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, गेल्या २५ वर्षांपासून ही खुली जागा अतिक्रमित अवस्थेत असून येथे सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक कार्यक्रम नियमितपणे होत आहेत. याच ठिकाणी नवसाला पावणारे माता सतवाई देवीचे मंदिर असून नवरात्रोत्सव व इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. नागरिकांचा आरोप आहे की, खुल्या जागेवर अतिक्रमण करून आरसीसी बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेवर गदा येत आहे.
या संदर्भात रामनगर सुधार समिती व स्थानिक रहिवाशांनी नगर परिषद, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. नियमांनुसार नगर परिषद कार्यालयाकडून संबंधितांना तीन दिवसांची नोटीस देण्यात आली असून आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र कागदपत्रे सादर होऊनही अतिक्रमण हटविण्याची प्रभावी कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणामुळे भंडारा शहरात ‘बिल्डर लॉबीसमोर प्रशासन नमते का घेत आहे?’ असा प्रश्न उपस्थित होत असून, खुल्या जागेवर होणाºया अतिक्रमणाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. न्याय मिळावा यासाठी आणि प्रशासनावर दबाव येण्यासाठी ही बाब प्रसारमाध्यमांतून जनतेसमोर मांडण्यात यावी, अशी मागणी रामनगर परिसरातील रहिवाशांनी केली आहे.