
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार २६ जानेवारी २०२६ रोजी पोलीस मुख्यालय पोलीस कवायत मैदान येथे सकाळी ९.१५ वा. राष्ट्रध्वज वंदन व संचलनाचा मुख्य शासकीय समारंभ होणार आहे. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोषाखात समारंभ सुरु होण्यापूर्वी २० मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सोबत कोणतेही बँग किंवा तत्सम वस्तू आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था,आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी ८.३० वाजेपूर्वी किंवा १० वाजेनंतर आयोजित करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. गृह विभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असेही आवाहनही जिल्हा प्रशासनाने आहे.