मांडवी घाटावरून तब्बल ५५ ब्रास रेतीसाठा चोरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा महसूल विभागाने मांड- वी रेती घाटावर अवैधरित्या साठवणुक केलेला रेतीसाठा जप्त करून पोलीस पाटलांच्या सुप्रतनाम्यावर संरक्षित ठेवला असता अज्ञात व्यक्तींनी सदर रेतीसाठयामधील जवळपास ५५ ब्रास रेतीसाठा चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने तिरोडा महसूल विभागात खळबळ माजली. रेती साठा चोरी होऊन दोन दिवस उलटून गेले असतांनाही याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल न झाल्याने उलट सुलट चर्चेला पेव फुटले आहे.

याबाबत मंडळ अधिकारी शहारे यांना विचारणा केली असता पोलीस पाटील तक्रार नोंदवण्यात गेल्या होत्या मात्र पोलिसांनी सदर प्रकरणी महसूल विभागांने तक्रार नोंदवावी असे सांगितल्यामुळे तक्रार नोंदविल्या गेली नसून आज तक्रार नोंदविण्याच्या सूचना ग्राम महसूल अधिकाºयांस देण्यात आल्याचे सांगितले. तिरोडा तालुक्यात वैनगंगा नदीवरील काही रेती घाटाचे लिलाव करण्यात आले असुन या घाटावरून रॉयल्टी देऊन रेती वाटप करण्याकरिता डेपो तयार करण्यात आले आहे.

या रेतीघाटातुन रॉयल्टी काढून रेतीचे वाटप होत असले तरी मोठ्या प्रमाणात अवैध्यरित्या अनेक घाटावरून रेती चोरी होत असल्याने या अवैध्य रेती चोरीस आळा बसावा याकरीता तहसीलदार एन. एम. ठाकरे यांनी भरारी पथकाची नेमणुक केली आहे. दरम्यान भरारी पथकास वैनगंगा नदीचे मांडवी घाटावर अवैध रेतीसाठा असल्याची माहिती मिळाल्याने २० जानेवारी रोजी तिरोडा महसूल विभागातर्फे मंडळ अधिकारी सुनील शहारे, तलाठी साझा क्रमांक १७ चे ग्राम महसूल अधिकारी ईशांत दमाहे व कर्मचाºयांनी मोक्यावर जाऊन पाहणी करून अवैध रेतीसाठा जप्त करून या साठ्यावर चुन्याने मार्किंग करून हा साठा घरकुल लाभार्थी किंवा शासकीय कामाकरिता वापरण्याते यावे यासाठी पोलीस पाटील यांचे ताब्यात देण्यात आले. मात्र अज्ञात चोरट्यांनी हा रेती साठा चोरून नेल्याची बाब महसूल विभाग व पोलीस पाटलांचे लक्षात आल्यावरून पोलीस पाटलांनी या चोरीची तक्रार पोलीस स्टेशन तिरोडा येथे देण्यास २२ रोजी गेल्या असता पोलिसांनी महसूल विभागाचे अधिकारी किंवा कर्मचाºयांनी तक्रार द्यावी असे सांगितले त्यामुळे तक्रार नोंदविण्यात आली नाही.

मात्र या गंभीर घटनेमुळे तिरोडा महसूल विभागासह तालुक्यात खळबळ उडाली असून याबाबत मंडळ अधिकारी सुनील शहारे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितल्यानुसार आम्ही जप्त केलेला रेतीसाठा पोलीस पाटलांचे सुप्रत नाम्यावर होता मात्र रेती चोरी गेल्याची माहिती पोलीस पाटलांनी दिल्यावरून आम्ही त्यांना तक्रार देण्यास सांगितल्या वरुन त्या तक्रार देण्यास गेल्या होत्या मात्र पोलिसांनी तक्रार महसूल विभागातर्फे देण्यात आल्यास आम्ही कारवाई करू असे सांगितल्याने तक्रार नोंद झाली नव्हती मात्र आज दिनांक २३ रोजी वरिष्ठांचे आदेशावरून मी ग्राम महसूल अधिकारी यांना तिरोडा पोलीस स्टेशनला तक्रार देण्याच्या सूचना दिल्याने तक्रार देण्याची कार्यवाही लवकरच होईल असे सांगितले. या गंभीर घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र महसूल विभागाचे भरारी पथक असतानाही एवढा मोठा रेतीसाठा चोरी गेल्याने संपूर्ण महसूल विभागात व तालुक्यात खळबळ उडाली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *