
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नागपूर नाका परिसरात एक कारचालक चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्याला शक्य झाले नाही. त्यामुळे कार चालकाने संतापून चक्क महामार्गावर एसटी बस अडवली आणि तिथेच धिंगाणा घालायला सुरुवात केली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन काही काळ ठप्प झाली. अखेर पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला. राष्ट्रीय महामार्गावर चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात स्वत:ची चूक असतानाही, एका कार चालकाने एसटी महामंडळाच्या बसला अडवून महामार्गावरच धिंगाणा घातला. सदर घटना भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात घडली.
नागपूरच्या दिशेने जाणाºया एसटी बससमोर कार आडवी घालून झालेल्या या वादामुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली होती, तर प्रवाशांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागला. वाद इतका विकोपाला गेला की शेवटी एसटी चालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाची बस नागपूरच्या दिशेने मार्गस्थ होती. दरम्यान, भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात एका कार चालकाने चुकीच्या बाजूने एसटी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यात कार चालकाची स्वत:ची चूक असतानाही, त्याने एसटी बस थांबवून चालकासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. कार चालकाच्या या उद्दामपणामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंच्या वाहनांच्या रांगा लागल्या. वाद बराच वेळ चालल्यानंतर एसटी चालकाने प्रसंगावधान राखत बस थेट भंडारा पोलीस ठाण्यात नेली आणि कार चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकारामुळे बसमधील प्रवासी ताटकळले होते.