
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : तालुक्यातील कुडेगाव येथील एका कष्टाळू शेतकºयावर निसगार्चा कोप नव्हे, तर दुर्दैवाचा डोंगर कोसळला आहे. मोठ्या आशेने खरेदी केलेला ‘जॉन डिअर ५०३९’ हा ट्रॅक्टर अज्ञात कारणाने जळून खाक झाला असून, यात त्यांचे सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगेश मधुकर उरकुडे (४७) असे पिडीत ट्रँक्टर मालकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार गुरुवारी (१२ मार्च) सायंकाळपर्यंत कुडेगाव-गवराळा मार्गावरील शेतात गव्हाची काढणी जोमाने सुरू होती. हार्वेस्टरने काम आटोपल्यानंतर रात्र झाल्याने मंगेश यांनी आपला एम.एच.३३ . ए सी ८६३५ क्रमांकाचा ट्रॅक्टर सुरक्षित समजून शेतातच उभा केला. मात्र, काळाच्या मनात काही वेगळेच होते. शुक्रवारी सकाळी जेव्हा मंगेश शेताकडे गेले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांच्यापायाखालची जमीनच सरकली. रात्रभर धगधगणाºया आगीत त्यांच्या कष्टाचे इंजिन पूर्णपणे कोळसा झाले होते.