
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज दि.२२ मार्च रोजी भंडारा शहरात ओबीसी संघटनांतर्फे महामोर्चा काढण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारने तात्काळ ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, आगामी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना असावा, युजीसी समता विधेयक २०२६ लागु करण्यात यावा,केंद्रात ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्यात यावे या मागण्यांसाठी आजचा हा मोर्चा काढण्यात आला.
भंडारा शहरातील दसरा मैदानावरून या मोर्चाला सुरूवात करण्यात आली व जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या आंदोलनात ओबीसी संघर्ष समितीचे पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनाद्वारे ओबीसी समाजाने आपल्या हक्कासाठी एकजुटीचा संदेश दिला असून, प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. भंडारा येथे ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत मोठा मोर्चा काढला होता. या मोर्चाला कोणत्याही एका पक्षापुरते मर्यादित न ठेवता सर्वच राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी आपली शक्ती पणाला लावली. या मोर्चा महिलाआणि युवकांची उपस्थिती अत्यंत लक्षणीय होती. सर्व आंदोलकांनी पिवळ्या टोप्या आणि दुपट्टे परिधान केले होते, ज्यामुळे संपूर्ण शहर पिवळ्या रंगात न्हाऊन निघाले होते. ‘जय ओबीसी, जय संविधान’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
केंद्र सरकार आश्वासन देऊन मागे हटले!
निवडणूकपूर्व काळात आश्वासन देऊनही, प्रत्यक्ष जनगणनेच्या प्रक्रियेत (गॅझेटमध्ये) ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना देण्यात आलेला नाही. केंद्र सरकारने जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र विचार न केल्याबद्दल आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला.विरोधी पक्षनेत्यांनी केंद्र सरकारवर ‘यू-टर्न’ घेतल्याचा आरोप केला. पंतप्रधानांनी संसदेत आश्वासन देऊनही आता सरकार त्यापासून मागे हटत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार नाना पटोले, अभिजित वंजारी आणि चरण वाघमारे यांसारख्या बड्या नेत्यांनी भाषणातून सरकारवर कडक ताशेरे ओढले. सदानंद इलमे, प्रभाकर वैरागडे, रमेश शहारे, संजय मते आणि डॉ. बाळकृष्ण सार्वे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी भगीरथ धोटे, उमेश कोर्राम, गोपाल सेलोकर आणि जयंत झोडे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेषत: महिला आघाडीच्या मंगला वाडीभस्मे, ललिता देशमुख, वृंदा गायधने आणि भावना निकुळे, जयश्री बोरकर यांच्या सक्रिय सहभागामुळे आंदोलनाला मोठी ताकद मिळाली. तसेच शुभदा झंझाळ, अनिता बोरकर, मनोज बोरकर आणि अरुण भेदे यांच्यासह हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपला पाठिंबा दर्शविला.यावेळी भंडारा शहरातील रस्त्यावर पिवळे वादळ अवतरल्याचे चित्र होते.