
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : मुख्यमंत्री सहाय्यता निधी रुग्णांसाठी ‘देवदूत’ ठरले असून गोंदिया जिल्ह्यात वर्षभरात गरीब व दुर्बल रुग्णांना ६७ लाखांची आर्थिक मदत केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिनांक १ मे २०२५ ते २७ मार्च २०२६ या कालावधीत एकूण ८८ लाभार्थ्यांना ६७ लाख ५० हजार रुपये इतकी आर्थिक मदत देण्यात आलेली आहे. राज्यातील गरजू रुग्णांना गंभीर आजा- रांच्या उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यरत आहे. नैसर्गिक आपत्ती, मोठे अपघात तसेच विविध गंभीर आजारांवरील उपचारांसाठी या निधीतून तातडीने आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच राज्यातील नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये उपचार घेणाºया आणि इतर शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळू न शकणाºया गरीब रुग्णांनाही या योजनेचा लाभ दिला जातो.
या योजनेअंतर्गत कर्करोग, हृदयरोग, अवयव प्रत्यारोपण, अस्थिमज्जा प्रत्यारोपण, डायलिसिस, मेंदूचे आजार, जळीत रुग्ण तसेच इतर गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. पूर्वी या निधीकरीता अर्ज करण्यासाठी नागरिकांना मुंबई गाठावी लागत असे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वेळ आणि खर्चाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही पायपीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूर केली. कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या पुढाकारातून राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष स्थापनकरण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने १ मे २०२५ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धमार्दाय रुग्णालय मदत कक्ष कार्यरत करण्यात आला आहे.
या कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व उपचारासाठी आर्थिक मदतीबाबत मार्गदर्शन केले जाते. सदर कक्ष जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या प्रमुख नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले व वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिगंबर मरस्कोले यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश येरपुडे, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक मारोती कुचनकर व समन्वयक अभिषेक भलाई काम करीत आहेत. अर्ज कोण करु शकते : या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी रुग्णांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.६० लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. अर्जासोबत विहित नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वैद्यकीय खचार्चे अंदाजपत्रक तसेच संबंधित आजाराची वैद्यकीय कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते. तसेच अपघातग्रस्त लाभार्थ्यांचा एम.एल.सी. रिपोर्ट (मेडिकल लिगल केस) असणे अनिवार्य आहे. गोंदिया जिल्ह्यात २०२५-२६ या आर्थिक वर्षात ८८ रुग्णांना मदत करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.