भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया :- स्वातंत्र्यदिनाच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी कुटुंबीयांसह जवळच्या परिसरात फिरायला गेलेल्या दोन युवकांवर काळाने घाला घातला. चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धासगड येथील पाण्याच्या झºयात शनिवारी (१५ आॅगस्ट) दुपारी दोन युवक बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत कृष्णा लखन कापगते (वय २०, रा. बोपाबोडी, सौंदड, ता. सडक अर्जुनी) याचा मृतदेह शोध पथकाला सापडला असून, हेतराम गुलाब सायाम (वय २५) याचा शोध अद्याप सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली. १५ आॅगस्ट शनिवार आणि १६ आॅगस्ट रविवार अशी सलग दोन दिवस शासकीय सुटी असल्याने दोन्ही युवक जवळच्या परिसरात फिरण्यासाठी गेले होते.
धासगड येथील पाण्याच्या झºयात उतरल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच चिचगड पोलिसांसह महसूल विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे शोध व बचाव पथक तसेच स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात शोधमोहीम सुरू करण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर कृष्णा कापगते याचा मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले. मात्र हेतराम सायाम याचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नसून त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे बोपाबोडी परिसरावर शोककळा पसरली आहे. सुटीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांवर या दुर्घटनेने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पावसाळ्यात नैसर्गिक जलस्रोतांमध्ये पाण्याची खोली, प्रवाह आणि तळाचा अंदाज येत नसल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासना कडून करण्यात येत आहे.