
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरात चोरांनी धुमाक- ूळ घालत एकाच रात्रीत तब्बल १२ हून अधिक दुकानांचे शटर तोडून चोरी केल्याची खळबळजनक घटना आज दि.०८ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. चोरांच्या या धाडसामुळे शहरातील व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चोरांनी शहरातील विविध भागांतील मुख्य बाजारपेठाना लक्ष्य केले. यात कुकडे नर्सिंग होम परिसर, राजीव गांधी चौक, मुस्लिम लायब्ररी परिसर आणि गणेशपूर या भागांचा समावेश आहे.
भंडारा शहरातील कुकडे नर्सिंग होम परिसरातील ‘अश्विनी अमृततुल्य’ या चहाच्या दुकानाचे शटर तोडून ५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरटयांनी लंपास केली. तसेच शेजारील आणखी २ दुकानेही फोडली गेली. राजीव गांधी चौक परिसरातील ४ दुकानांचे शटर तोडण्यात आले. माँ भवानी हाँईट्स नावाचे इमारतीमधील ग्रीन कॅफे हॉटेल चे मालक मयुर खोब्रागडे यांचे दुकानाचा शटर तोडुन अंदाजे १५०० रूपयांवर हात साफ केला. येथील एका बारमध्येही चोरांनी शिरकाव केला, मात्र तिथून काहीही चोरीला गेले नसल्याचे सांगण्यात आले. मेट्रो इलेक्ट्रिकल्स दुकानातून चोरांनी २,००० रुपयांची रोख रक्कम चोरली आहे.गणेशपूर येथील एका मेकॅनिकल दुकानाचे शटर तोडून चोरीचा प्रयत्न झाला.तर बेला गावातील दिनेश पान पॅलेस नावाची दिनेश साठवने याची सुद्दा दुकान तोडुन अंदाजे १००० रुपये चोरांनी चोरून नेले.
चोरांनी अत्यंत शिताफीने दुकानांची शटरं वाकवून किंवा तोडून आत प्रवेश केला. अनेक दुकानांतून मालाची चोरी झाली नसली तरी शटर तोडल्यामुळे दुकानदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. एकाच दिवशी आणि एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने दुकाने फुटल्याची ही पहिलीच घटना असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण दिसुन येत आहे. एकाच रात्रीत १२ दुकाने फुटल्यामुळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.‘एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुकाने फुटणे ही शहराच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. मुस्लिम लायब्ररी परिसरताील २ दुकानांना लक्ष्य केले. ‘एल.ओ.सी. चाय’ या दुकानातील गल्ल्यातून ४ हजार रुपयांची रोकड लंपास केली. तसेच येथील एका आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंकच्या दुकानाचेही शटर तोडून नुकसान करण्यात आले. याप्रकरणी भंडारा पोलीसांनी गुन्हा नोंद केले असुन पुढील तपास भंडारा पो.नि.भुसारी यांच्या मार्गदर्शनात पो.हवा. आशिष गभने हे करीत आहेत.