नागपूर जिल्ह्याात डिजिटल क्रांती ७१ टक्के वीजबिलांचा भरणा आॅनलाईन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : डिजिटलायझेशनच्या युगात महावितरणच्या नागपूर जिल्ह्यातील लघुदाब ग्राहकांनी आॅनलाईन वीजबिल भरण्याला मोठी पसंती दिली आहे. नुकत्याच संपलेल्या २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील तब्बल ७१.०३ टक्के ग्राहकांनी आपल्या वीजबिलांचा भरणा करण्यासाठी आॅनलाईन पर्यायाचा अवलंब केला असून, एकूण जमा महसुलापैकी ७७.२३ टक्के रक्कम डिजिटल माध्यमातून प्राप्त झाली आहे. महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्समुळे वीज ग्राहकांना घरबसल्या बिल भरणे सोपे झाले असून, त्याचा सकारात्मक परिणाम आकडेवारीतून स्पष्टपणे दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात वर्षभरात एकूण १ कोटी ५३ लाख ६३ हजार ३९० व्यवहार झाले, ज्यामध्ये ३६४०.८६ कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला. यापैकी १ कोटी ११ लाख ३९ हजार ११६ व्यवहार हे आॅनलाईन पद्धतीने झाले असून, त्याद्वारे २८२८.२३ कोटी रुपये महावितरणच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

नागपूर शहर मंडळात आॅनलाईन बिल भरण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. या मंडळातील ७४.५७ टक्क्यांहून अधिक ग्राहकांनी डिजिटल पेमेंटचा वापर केला असून, एकूण महसुलाच्या ७६ टक्के रक्कम म्हणजेच २३४३.५६ कोटी रुपये आॅनलाईन जमा झाले आहेत. दुसरीकडे, ग्रामीण भागातही ग्राहकांचा कल डिजिटलकडे वेगाने झुकत आहे. ग्रामीण मंडळातील ६७.५० टक्के ग्राहकांनी ५८४.६७ कोटी रुपयांचा भरणा आॅनलाईन पद्धतीने केला असून, हे चित्र ग्रामीण भागातील वाढती तांत्रिक साक्षरता दर्शविणारे आहे. एकेकाळी वीज बिल भरण्यासाठी केंद्रांवर लागणाºया लांबच लांब रांगा आता इतिहासजमा होताना दिसत आहेत. जिल्ह्यात केवळ २८.९८ टक्के ग्राहकांनीच आॅफलाईन पद्धतीने (रोख किंवा चेकद्वारे) बिलांचा भरणा केला आहे. एकूण महसुलात आॅफलाईन व्यवहारांचा वाटा आता केवळ २२.७६ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिला आहे. महावितरणने डिजिटल पेमेंट करणाºया ग्राहकांसाठी सवलतींचा वर्षाव केला आहे.

ग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाइटवर तसेच ‘महावितरण’ मोबाइल अ‍ॅप, महापॉवर पे आणि उपलब्ध इतरही पेमेंट गेटवे च्या माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने देयकाचा भरणा केल्यास ग्राहकांना दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सवलत मिळते. तसेच, विहित मुदतीपूर्वी बिल भरणाºयांना ‘तत्पर देयक सवलत’ दिली जाते. याशिवाय, कागदी बिलांऐवजी ‘गो-ग्रीन’चा पर्याय स्वीकारल्यास बिलामध्ये वार्षिक १२० रुपयांची अतिरिक्त सवलत मिळते. वेळेची बचत, २४ तास उपलब्ध सुविधा, सुरक्षितता आणि पारदर्शकता ही या प्रणालीची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व माध्यमांतून बिल भरण्यास कसलेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. आॅनलाईन वीजबिल भरताच ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे त्वरित पोच मिळते. तसेच पेमेंट हिस्ट्री व पावती वेबसाईटवर उपलब्ध असते. हे पेमेंट अत्यंत सुरक्षित असून त्यास रिझर्व्ह बँकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा-२००७ च्या तरतुदी लागू आहेत. “डिजिटल पेमेंटमुळे ग्राहकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचत असून ही प्रक्रिया पर्यावरणपूरक आहे, तरी उर्वरित ग्राहकांनीही सुरक्षित आणि सोयीस्कर अशा डिजिटल पयार्याचा अवलंब करावा,” असे आवाहन महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *