
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा तालुक्यातील मांडवी नदीपात्र सध्या अवैध वाळू साठवणुक व वाहतुकीचे केंद्र बनले असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर रेतीची चोरटी वाहतुक सुरू असल्याचे चित्र दिसुन येत आहे. प्राप्त माहितीनुसार मोहाडी तालुक्यातील ढिवरवाडा नदीपात्रातुन जेसीबी, पोकलँडसारख्या यंत्रांच्या यंत्रांच्या साहाय्याने रेतीचा उपसा करून मांडवी परिसरात त्याची साठवणुक करून त्याची चोरटी वाहतुक केली जात आहे.
हा सगळा प्रकार रात्री ते पहाटे- दरम्यान सर्रासपणे चालत असतांना महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थागुशा विभाग यासह संबंधित यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असताना प्रशासनाला याची माहिती नसणे अशक्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
पर्यावरणीय हानी
अवैध वाळू उपशामुळे नदीपात्राची नैसर्गिक रचना बिघडत असून, पाण्याचा प्रवाह विस्कळीत होत आहे. यामुळे भूजल पातळी कमी होणे, नदीकाठची जमीन खचणे, तसेच पूरस्थितीत धोका वाढणे अशा गंभीर परिणामांची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. नदीपात्रातील अति उत्खननामुळे स्थानिक शेतकºयांनाही फटका बसत असून, शेतीसाठी आवश्यक असलेला पाण्याचा साठा कमी होत आहे. त्यामुळे या प्रकाराकडे केवळ महसूल हानी म्हणून नव्हे, तर पर्यावरणीय संकट म्हणून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
महसूल विभागाच्या भरारी पथकाची भूमिका संशयाच्या भोवºयात
तालुक्यात अवैध उत्खनन रोखण्यासाठी तहसील कार्यालयाकडून भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांचा समावेश असून, २४ तास गस्त घालण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र, प्रत्यक्षात हे पथक कुचकामी ठरत असल्याचे चित्र आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असताना पथकाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक पातळीवर दबाव व भीतीचे वातावरण
या अवैध व्यवसायात गावातीलच संग्रहित छाया… काही माजी ग्रामपंचायत पदाधिकारी, काही प्रभावशाली व्यक्ती व बाहेरील घटक यांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रकाराला विरोध करणाºयांवर दबाव आणला जातो, तसेच तक्रार करणाºयांना धमक्या दिल्या जात असल्याची माहिती नागरिकांकडून मिळत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक भीतीपोटी पुढे येत नाहीत आणि अवैध वाळू उपसा बिनधास्त सुरू राहतो.