
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील आमगाव येथील धान गोदामात मागील वर्षीचा साठा पडुन असल्याने परिणामी गोदामाबाहेर ५० ट्रक तांदळाचे ट्रक ताटकळत उभे असल्याचे चित्र आहे.या सगळ्या प्रकाराला संबंधीत प्रशासकीय यंत्रण जबाबदार असुन या सगळ्या प्रकारामुळे मिलर्स ना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे. माहितीनुसार, आमगाव धान गोदामातून तांदूळ उचलण्याची जबाबदारी बुलढाणा जिल्ह्याला देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही तांदळाची उचल न झाल्याने गोदामात जागाच उपलब्ध नाही. परिणामी सुमारे ५० ट्रक तांदळाने भरलेले गोदाम परिसरातच ताटकळत उभे आहेत. या अव्यवस्थेमुळे मागील १५ दिवसांपासून ट्रकांची लांबच लांब रांग लागलेली आहे.
याचा थेट फटका ५३ मिलर्स लांकांना बसत असून त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मिलर्स च्या मते, प्रत्येक ट्रक मागे दररोज सुमारे २५०० इतका तोटा होत आहे, ज्याचा त्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होत आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी गोदामाची मर्यादित क्षमता (फक्त ६३ लॉट) असल्याचे समोर येत आहे. त्याच वेळी ५३ मिलर्स ंना सातत्याने आॅनलाइन लॉट दिले जात आहेत. यावर्षी खासगी गोदामाची कोणतीही व्यवस्था न केल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या बेजबाबदारपणा उघड होत असुन अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तांदूळ उचलण्याची जबाबदारी देऊनही तांदळाची उचल का झाली नाही? विभागांमध्ये समन्वयाचा अभाव आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मिलर्स ना होत असलेल्या नुकसानीची भरपाई कोण करणार? प्रशासनाने तातडीने तांदूळ उचल करण्याची करण्याची तसेच पर्यायी गोदामाची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मिलर्स तर्फे करण्यात आली आहे.