
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : खरीप हंगाम २०२५-२६ मधील धान खरेदीवरील मर्यादा तात्काळ वाढविण्याच्या प्रमुख मागणीसाठी भंडारा जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार एल्गार मोर्चा काढला गेला. बसस्टॉप परिसरातून सुरुवात झाली. मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी खासदार डॉ. प्रशांत पडोळे, कॉ. माधवराव बांते, राजेश हटवार, कॉ. शिवकुमार गणवीर, कॉ. हिवराज उके, हैशोक शरणागते, पवन मस्के, राकेश कारेमोरे, शीलवंत मेश्राम, चंद्रशेखर हटवार यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकरी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या नेतृत्वाखाली व धान खरेदी केंद्र संचालकांच्या सहभागातून आयोजित या मोर्चात शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शेतकरी संघटनांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी अत्यल्प खरेदी मर्यादा निश्चित करण्यात आल्यामुळे सुमारे २५ ते ३० लाख क्विंटल धान खरेदीविना शिल्लक राहिले आहे. यामुळे शेतकºयांना हमीभावाऐवजी कमी दरात धान विकावे लागत असून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच खरेदी झालेल्या धानाचे पैसेही वेळेत मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. मोर्चानंतर जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. यामध्ये धान खरेदी मर्यादा वाढविणे, शेतकºयांना २५ दिवसांत पैसे देणे, धान उचल प्रक्रिया वेगवान करणे व बोनस जाहीर करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. दरम्यान, शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.