
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दि. २८ एप्रिल २०२६ महिला व बाल विकास विभागाच्या वतीने केंद्र सरकार पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर, भंडारा येथे दाखल झालेल्या एका भटकलेल्या महिलेची यशस्वी ओळख पटवून तिला सुरक्षितपणे तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आल्याची हृदयस्पर्शी घटना घडली आहे. सखी वन स्टॉप सेंटर हे हिंसाचारग्रस्त व संकटग्रस्त महिलांसाठी एकाच छताखाली निवारा, समुपदेशन, कायदेशीर मदत व पोलीस सहाय्य उपलब्ध करून देणारे केंद्र आहे. येथे पीडित महिलांसाठी ५ दिवसांच्या निवासाची व्यवस्था असून आवश्यकतेनुसार त्यामध्ये वाढ केली जाते. दि. १७ एप्रिल २०२६ रोजी रात्री वरठी येथील श्रीकृष्ण ज्वेलर्स समोर एक अनोळखी महिला घाबरलेल्या व गोंधळलेल्या अवस्थेत आढळून आली.
याबाबतची माहिती वरठी पोलीस स्टेशनला देण्यात आली. महिलेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तिला सखी वन स्टॉप सेंटर, भंडारा येथे दाखल करण्यात आले. केंद्रात दाखल झाल्यानंतर संबंधित महिलेला मानसिक आधार देण्यात आला. सुरुवातीचे दोन ते तीन दिवस ती अत्यंत भीतीग्रस्त अवस्थेत असल्याने स्वत:बद्दल कोणतीही माहिती देण्यास तयार नव्हती. केंद्र प्रशासन व कर्मचाºयांनी संयमाने व आपुलकीने संवाद साधत तिचा विश्वास संपादन केला. संवादातून उघड झालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादामुळे ती हैदराबाद येथे आईकडे गेली होती. नंतर आईने तिला सासरी जाण्यासाठी रेल्वेत बसवले. मात्र तिच्याकडील सुमारे सहा हजार रुपये अज्ञात व्यक्तीने हिसकावून घेतल्याने ती घाबरली व मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली. त्यानंतर ती रेल्वेतून उतरल्याचे सांगत होती.
महिलेने ‘सेसन’ असे सासरचे गाव सांगितले होते; मात्र त्यापलीकडे कोणतीही ठोस माहिती नव्हती. सखोल शोध घेतल्यानंतर व दिलेल्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे गुन्हे शाखेच्या मदतीने तिचा पत्ता राजस्थान राज्यातील सेसन, खेडली काजी, ता. पहाडी असा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पहाडी येथील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून स्थानिक सरपंचांमार्फत तिच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. दि. २६ एप्रिल २०२६ रोजी संबंधित महिलेची आई हैदराबाद येथून भंडारा येथे आली. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून व ओळख पटवून संबंधित महिलेला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. बराच काळ आपल्या मुलीची वाट पाहणाºया कुटुंबीयांना ती सुखरूप परत मिळाल्याने भावनिक वातावरण निर्माण झाले. कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. या प्रकरणात केंद्रप्रशासक लता मोहरकर, केस वर्कर रुपाली कुंभारे, सुरक्षा रक्षक मंगला घोनमोडे व इतर कर्मचाºयांनी मोलाचे योगदान दिले. महिलेची आई यांनी सर्व कर्मचाºयांचे आभार मानले. सदर महिलेचे नाव फातिमा जमशेद खान (वय २५) असे आहे.