
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : राजकारणात जनहितासाठी आंदोलने होणे अपेक्षित असते, मात्र तुमसर नगरपरिषदेत सध्या सुरू असलेला ‘मडके’ आणि ‘हार’ राजकारणाचा प्रकार म्हणजे जनतेने नाकारलेल्या काही नेत्यांचा सत्तेसाठी चाललेला केविलवाणा प्रयत्न असल्याचे उघड झाले आहे. ज्या नेत्यांना तुमसरच्या मतदारांनी निवडणुकीत घरचा रस्ता दाखवला, तेच आता पालिकेच्या दालनात घुसून पत्रकार परिषदा घेत आहेत. हा सर्व ‘अघोरी’ खेळ केवळ ‘स्वीकृत सदस्य’ पदावर वर्णी लावण्यासाठी सुरू असून, तुमसरची जनता या राजकीय स्वार्थाला उघड्या डोळ्यांनी बघत आहे.
कार्यकर्ते तेच, मुद्दे तेच; फक्त नगराध्यक्ष बदलले!
हा सर्व प्रकार म्हणजे ‘जुन्या बाटलीत नवी दारू’ असा आहे. २०२१ पासून सुरू असलेल्या ४७ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेवरून २०२२ मध्येही हेच कार्यकर्ते तत्कालीन नगराध्यक्षांविरुद्ध नेमके हेच मुद्दे घेऊन आंदोलने करत होते. आज २०२६ मध्येही तेच लोक, तोच जुना प्रश्न घेऊन विद्यमान नगराध्यक्षांच्या खुर्चीचा अवमान करणाºयांच्या पडद्यामागे आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की, या मंडळींना शहराचा पाणी प्रश्न सुटावा यात काडीचाही रस नसून, केवळ स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना आंदोलनाचा ‘स्टंट’ करायचा आहे.
नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीत ‘अघोरी’ कृत्य आणि जादूटोणा!
नगराध्यक्ष इंजि. सागर गभणे हे दालनात उपस्थित नसताना त्यांच्या खुर्चीला हार घालणे आणि टेबलावर मडके ठेवणे, हे कृत्य महाराष्ट्र जादूटोणाविरोधी अधिनियम २०१३ नुसार गंभीर गुन्हा आहे. एका लोकसेवकाच्या जिवंतपणी त्यांचा ‘तेरवा’ साजरा करण्याचे अमानुष कृत्य करून विरोधकांनी आपली वैचारिक दिवाळखोरी सिद्ध केली आहे. ज्यांच्या काळात ४७ कोटींचा निधी खर्च होऊनही शहराला पाणी मिळाले नाही, तेच आता ‘रकळ’ चौकशीच्या भीतीने नगराध्यक्षांचा मानसिक छळ करण्यासाठी अशा अघोरी प्रथांचा आधार घेत आहेत.
सत्तेचा मोह आणि प्रशासकीय शिस्तीचा भंग
ज्यांना जनतेने निवडणुकीत नाकारले, ते कोणत्याही अधिकृत पदावर नसताना पालिकेत शिरून पत्रकार परिषदा कशी काय घेऊ शकतात? हा प्रशासकीय शिस्तीचा मोठा भंग आहे. केवळ स्वीकृत सदस्यत्वाच्या शर्यतीत पुढे राहण्यासाठी आणि नगराध्यक्षांवर दबाव निर्माण करण्यासाठी महिलांना ढाल म्हणून वापरणे, ही तुमसरची संस्कृती नाही, अशी टीका आता सर्वत्र होत आहे.