
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पश्चिम बंगाल आणि आसाम राज्यांतील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल आमदार डॉ. परिणय फुके यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, हा निकाल केवळ राजकीय विजय नसून जनतेने दिलेला स्पष्ट संदेश आहे. या निवडणुकीत जनतेने ठामपणे दाखवून दिले आहे की हिंदू समाजाचे खच्चीकरण, मुस्लिम तुष्टिकरण, हिंदू जातींचे विभागीकरण, गुन्हेगारांचे उदात्तीकरण, देशाचे बबार्दीकरण आणि काही कुटुंबांचे श्रीमंतीकरण— या प्रवृत्ती आता देशातील मतदारांना मान्य नाहीत. जनतेने विकास, सुरक्षितता आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देत भारतीय जनता पक्षावर विश्वास व्यक्त केला आहे, असे त्यांनी नमूद केले.
या विजयामागे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे संघटन कौशल्य आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच केरळमध्ये भारतीय जनता पक्षाचे खाते उघडणे ही एक सकारात्मक सुरुवात असून, येत्या काळात तेथेही पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशभरात वाढत असलेला जनाधार लक्षात घेता, आगामी काळात इतर राज्यांमध्येही भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत होईल, असा ठाम विश्वास आमदार डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केला. विकास, विश्वास आणि राष्ट्रहिताच्या मार्गावर देशाचा प्रवास अधिक वेगाने पुढे जाईल, असेही त्यांनी शेवटी नमूद केले.