
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असणाºया महाराष्ट्राने ‘कनेक्टिव्हिटी’ मध्येदेखील देशातील बहुतांश राज्यांना मागे सोडले आहे. राज्यात मोबाईल टॉवर्स उभारणीचा विक्रमी विस्तार झाला असून, मागील पाच वर्षांत साडेबावीस हजारांहून अधिक टॉवर्स लागले आहेत. सद्य:स्थितीत राज्यातील एकूण टॉवर्सचा आकडा ९० हजारांहून अधिकवर पोहोचला असून, देशात ही दुसºया क्रमांकाची सर्वोच्च संख्या आहे, हे विशेष. कोरोना महामारीनंतर देशभरात डिजिटल सेवांचा वापर झपाट्याने वाढला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात इंटरनेट आणि मोबाइल कनेक्टिव्हिटीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली.
विशेषत: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये मोबाइल वापरकर्त्यांची संख्या वाढल्याने टेलिकॉम कंपन्यांनी या भागांकडे विशेष लक्ष देत टॉवर्स उभारण्याचा वेग वाढविला. ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागांमध्ये नेटवर्क पोहोचल्याने डिजिटल दरी कमी करण्यास मोठी मदत झाली आहे. ज्या गावांमध्ये पूर्वी मोबाइल सिग्नल मिळणेही कठीण होते, त्या ठिकाणी आता फोर जी आणि फाइव्ह जी सेवा सहज उपलब्ध होत आहेत.एप्रिल २०२१ मध्ये राज्यात ६७ हजार ६६९ मोबाइल टॉवर्स होते. यातील बहुतांश टॉवर्स शहरी भागांमध्ये होते. मात्र ग्रामीण व निमशहरी भागांत ग्राहकांमध्ये वाढ झाल्याने विविध मोबाइल कंपन्यांनी तेथेदेखील टॉवर उभारण्यास सुरुवात केली. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसपर्यंत महाराष्ट्रात मोबाइल टॉवर्सची संख्या ९० हजार ३५१ वर पोहोचली होती. पाच वर्षांत राज्यातील मोबाइल टॉवर्सच्या संख्येत ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.