
नागपूर : जिल्ह्यातील राऊळगाव (बाजारगाव नजीक) येथील एक्सप्लोसिव्ह फॅक्टरीमध्ये झालेला स्फोट अत्यंत भीषण असून, या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट द्वारे माहिती दिली की, ते स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
एनडीआरएफ आणि एसडीआरएफ ची पथके तातडीने मदतकार्यासाठी पोहोचली आहेत. या भीषण दुर्घटनेत १८ जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. “राऊळगाव येथील स्फोटाची घटना अतिशय दुदैर्वी आणि दु:खद आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत,” अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. तसेच, ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली आणि यात कोणाचा निष्काळजीपणा आहे का, याची सखोल चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.