थंडीच्या लाटेत गोंदियाचा पारा ८.२ अंशावर; नागपुरातही गारठा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : महापालिका निकालामुळे राजकारणाचा पारा तापला असताना वातावरणाचा पारा खाली घसरला आहे. ढगाळ वातावरणामुळे चार दिवस चढलेला पारा ढगांची गर्दी हटताच पुन्हा घसरायला सुरुवात झाली. गोंदियाचा पारा ८.२ अंशावर घसरून थंडीच्या लाटेत गेला आहे. नागपुरातही पारा घसरून गारठा वाढला आहे. पुढचे दोन-तीन दिवस थंडी आणखी वाढेल, असा अंदाज आहे. ढगाळ वातावरणामुळे सोमवारपासून तापमानात क्रमाक्रमाने वाढ झाली. नागपुरात किमान तापमान ९.६ अंशांवरून वाढत १३ अंशांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे गारठा थोडा कमी झाला होता. मात्र, आकाशातून ढगांची गर्दी हटली आणि पुन्हा तापमान खाली आले. २४ तासांत तापमान १.६ अंशांनी घसरून शुक्रवारी पहाटे ११.४ अंशांची नोंद करण्यात आली. त्यात पुन्हा १.२ अंशाची घसरण होत शनिवारी पहाटे किमान तापमान १०.२ अंशाची नोंद झाली आहे, जे सरासरीपेक्षा ३.१ अंशाने कमी आहे. दरम्यान, संपूर्ण विदर्भात तापमान घसरण्याचे सत्र दिसून आले.

गोंदियात दोन दिवसात तापमान ४.१ अंशांनी घसरून ८.२ अंशांवर खाली आले, जे राज्यात सर्वांत कमी आहे. येथील तापमान सरासरीपेक्षा ४.५ अंशाने खाली आहे. इतर ठिकाणीही तापमान एक ते दोन अंशांनी खाली घसरले आहे. यवतमाळचे तापमान १० अंश नोंदविण्यात आले, जे सरासरीपेक्षा ४.९ अंशाने कमी आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ढगांची गर्दी हटल्याने येत्या काही दिवसांत तापमान पुन्हा १० अंशांच्या खाली जाण्याची शक्यता आहे. पुढचे किमान चार दिवस म्हणजे २० जानेवारीपर्यंत तापमान घसरून थंडीत वाढ होण्याचा अंदाज आहे. एक किंवा दोन जिल्ह्यात नागरिकांना थंड लाटेचाही सामना करावा लागू शकतो. त्यानंतर पुन्हा ढगांची गर्दी होऊन तापमान अंशत: वाढेल, अशी शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. ढगांमुळे तापमान वाढले असले तरी ते सरासरी खाली असल्याने थंडीचा प्रभाव टिकून राहिला आहे व तो फेब्रुवारीपर्यंत कायम राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *