महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांविरोधात नारी सशक्तिकरण सामाजिक संघटना, भंडारा यांच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा तसेच पोलीस अधीक्षक भंडारा यांना निवेदन देण्यात आले. महिलांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने तातडीने कठोर व प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. संघटनेच्या वतीने शासकीय रुग्णालय भंडारा येथे एका वृद्ध महिलेवर झालेल्या अतिप्रसंगाच्या प्रयत्नाचा निषेध करण्यात आला. तसेच लाखनी येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घराशेजारी राहणाºया ५० वर्षीय व्यक्तीने अत्याचार करून तिला गरोदर केल्याच्या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात आला.

याशिवाय भंडारा येथील २३ वर्षीय तरुणी ही मागील ४८ तासांपासून बेपत्ता असून अद्याप तिचा शोध लागलेला नसल्याचा मुद्दाही संघटनेने उपस्थित केला. पोलिस प्रशासनाने या प्रकरणात अधिक गांभीर्याने तपास करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. अड्याळ येथील भोंदू बाबाच्या प्रकरणाचाही निवेदनात उल्लेख करण्यात आला. संबंधित भोंदू बाबा ‘मुलगी शोधून देतो’ असे सांगून पीडित पालकांकडून एक लाख रुपयांची मागणी करीत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला.

महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाने या सर्व घटनांची गंभीर दखल घेऊन महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण करून द्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. या वेळी नारी सशक्तिकरण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष युवराज शामकुवर, सचिव ज्योती मलोडे, मार्गदर्शक सूर्यभान हुमणे, विदर्भ महासचिव रंजना बागडे, विदर्भ सचिव ज्योत्सना गजभिये, जिल्हा उपाध्यक्ष शीलाताई मेश्राम, जिल्हा सचिव शितल नागदेवे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *