
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा गोंदिया विधान परिषदेसाठी भाजपचा उमेदवार जाहीर होताच काँग्रेस नेते आ. नाना पटोले यांना त्यांच्याच मतदारसंघात मोठा धक्का बसला असून लाखांदूर नगर पंचायतीचे चार नगरसेवक काँग्रेसचा हात सोडून भाजपावासी झाले आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघातील लाखांदूर हे त्यांच्या हक्काचे ठिकाण आहे. याच भागातून मिळालेल्या मतांच्या जोरावर नाना पटोले निसटता विजय मिळवून विधानसभेत पोहोचले होते. होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने पुन्हा एकदा अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी दिली. याच ब्राह्मणकरांनी पटोले यांना विधानसभेत घाम फोडला होता.
अवघ्या २०८ मतांनी पटोले निवडून आले होते. दरम्यान ब्राह्मणकर यांची उमेदवारी जाहीर होताच लाखांदूर नगर पंचायतीचे काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. पटोले यांचे अत्यंत निकटवर्ती आणि खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे स्वीकृत नगरसेवक बंटी सहजवानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तर नगरसेविका लोपा शिलार, वैशाली कुडेगावे, निशा बघमारे यांनी नागपूर येथे आ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी उमेदवार अविनाश ब्राम्हणकर, लाखांदूर चे नगराध्यक्ष विनोद ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर उपस्थित होते. आगामी निवडणुकीसाठी एक एक मतदार महत्त्वाचा असताना, भाजपवासी झालेले चार नगरसेवक नाना पटोले यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.