
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरालगतच्या करचखेडा गावाजवळ वैनगंगा नदीपात्रात रविवारी सायंकाळी घडलेल्या भीषण बोट दुर्घटनेत दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला, तर बोटीत असलेल्या अन्य पाच जणांनी प्रसंगावधान राखत पोहत किनारा गाठून आपला जीव वाचविला. या हृदयद्रावक घटनेमुळे भंडारा शहरासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
माहितीनुसार, रविवारी (७ जून) सायंकाळी सुमारे ६.३० वाजताच्या सुमारास सात जण खासगी बोटीने वैनगंगा नदीच्या मध्यभागी असलेल्या बेटावर आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ आटोपल्यानंतर ते परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र नदीच्या मध्यभागी अचानक बोट असंतुलित होऊन पलटली. क्षणार्धात सर्वजण पाण्यात फेकले गेले आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत कृष्णा जगन्नाथ बोकडे (वय २६, रा. चांदणी चौक, भंडारा) आणि पवन मुरली चौबे (वय ३४, रा. आंबेडकर वार्ड, भंडारा) हे दोघेही खोल पाण्यात बुडाले. तर आकाश केवट (२७), सुबोध विलास ढोक (२६), काशीनाथ फत्तू मेश्राम (३२), मृनाल बाळकृष्ण मंदुकर (२०) आणि अर्जुन मोतीराम मेश्राम (२९) यांनी प्रसंगावधान राखत पोहत किनारा गाठला आणि आपला जीव वाचविला.

रात्रभर शोधमोहीम
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, महसूल प्रशासन तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष सक्रिय झाला. जिल्हा शोध व बचाव पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. नदीतील वाढलेले पाणी, खोल प्रवाह आणि अंधार यामुळे शोधमोहीमेत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. तरीही बचाव पथकाने रात्रभर आणि सोमवारी सकाळपासून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू ठेवले. सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजताच्या दरम्यान कृष्णा बोकडे यांचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला.
नातेवाईकांनी ओळख पटविल्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय, भंडारा येथे पाठविण्यात आला. दरम्यान, दुसरे बेपत्ता असलेले पवन चौबे यांचा शोध सुरूच होता. अखेर दुपारी सुमारे पावणेचार वाजता त्यांचाही मृतदेह शोध पथकाला आढळून आला. त्यानंतर त्यांचाही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
अश्रूंनी भरलेला निरोप
शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह नातेवा- ईकांच्या ताब्यात देण्यात आले. कृष्णा बोक- डे यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी चांदणी चौक येथून अंत्ययात्रा काढून वैनगंगा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर पवन चौबे यांच्या पार्थिवावरही त्याच घाटावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेदरम्यान नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांची मृतक कृष्णा बोकडे मृतक पवन चौबे मोठी गर्दी झाली होती.
दोन्ही तरुणांच्या अकाली निधनामुळे उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.
दोन कुटुंबांवर दु:खाचा डोंगर
कृष्णा बोकडे हे अवघे २६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ आणि मोठा परिवार आहे. तर पवन चौबे हे ३४ वर्षांचे असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि मोठा चौबे परिवार आहे. दोघेही आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ असल्याने त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.
सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष?
स्थानिक नागरिकांच्या मते, नदीपात्रात खासगी बोटीने प्रवास करताना जीवनरक्षक जॅकेटचा वापर करण्यात आला होता की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.पावसाळ्याच्या तोंडावर नदीतील पाण्याचा वेग आणि खोली वाढलेली असताना अशा प्रकारे बोटीद्वारे बेटावर जाणे धोकादायक ठरू शकते, असे मत व्यक्त केले जात आहे.या दुर्घटनेनंतर नदीपात्रातील बोट वाहतुकीसंदर्भात अधिक कडक नियमावली लागू करण्याची तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शहरात हळहळ
करचखेडा येथील या दुदैर्वी दुर्घटनेने संपूर्ण भंडारा जिल्हा हादरला आहे. एका क्षणात दोन तरुणांचे जीव गेल्याने शहरात हळहळ व्यक्त होत असून सोशल मीडियावरही शोकसंदेशांचा वर्षाव होत आहे. मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली असून या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.