कारधा येथील पुलावर अंधाराचे साम्राज्य

गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : जिल्ह्यातील कारधा येथील राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलावर सध्या भीषण अंधाराचे साम्राज्य पसरले असून, बंद पडलेले पथदिवे आणि रस्त्याची दुरवस्था यामुळे प्रवाशांचा जीव अक्षरश: धोक्यात आला आहे. पुलावर सध्या रात्रीच्या वेळी पूर्णत: अंधाराचे साम्राज्य पसरले असून, यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत: मोटारसायकलस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या महत्त्वाच्या मार्गावर मूलभूत सुविधा ठप्प झाल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी पुलावर कोणतीही वीज व्यवस्था किंवा स्ट्रीट लाईट नसल्यामुळे समोरून येणाºया वाहनांच्या तीव्र हेडलाईटमुळे क्षणिक अंधत्व निर्माण होते.

परिणामी, मोटारसायकल चालवताना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण होते. अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज कामानिमित्त, शिक्षणासाठी किंवा इतर कारणांसाठी या पुलावरून रात्री प्रवास करणाºया नागरिकांनी सांगितले की, ‘समोरून एखादे मोठे वाहन आले की काही क्षण काहीच दिसत नाही. पुलावर लाईट नसल्यामुळे रस्ता कुठे आहे हे ओळखणे कठीण होते. त्यामुळे प्रत्येकवेळी जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागतो.’ स्थानिक नागरिकांच्या मते, पुलाचे बांधकाम पूर्ण होवून २५ वर्षांचा कालावधी लोटला मात्र याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने या पुलावरील समस्या वाढल्या आहेत. विशेषत: स्ट्रीट लाईटसारखी अत्यावश्यक सुविधा नसल्यामुळे पुलाचा वापर धोकादायक ठरत आहे. याकडे संबंधित सार्वजनिकबांधकाम विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

नागरिकांनी प्रशासनाकडे ठाम मागणी केली आहे की, या पुलावर तात्काळ वीज पुरवठा करून स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात यावी. तसेच, जर संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले, तर जिल्हाधिकारी यांनी स्वत: हस्तक्षेप करून संबंधित विभागाला आवश्यक आदेश द्यावेत, अशी मागणीही पुढे येत आहे. दरम्यान, कोणतीही अनिष्ट घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असून, पुलावर प्रकाशव्यवस्था उभारणे ही काळाची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. वैनगंगा पुलावरील अंधार आणि रस्त्याची दुरवस्था ही केवळ असुविधा नसून गंभीर अपघातांना आमंत्रण देणारी परिस्थिती आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *