
लाखोंचे नुकसान, अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरातील मध्यवर्ती आणि सर्वाधिक वर्दळीच्या मुख्य बाजारपेठेत (मोठा बाजार) मंगळवारी दुपारच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली. गांधी चौक ते बसस्थानक या मुख्य व्यापारी मार्गावरील लालचंद फॅशन शॉप या जुन्या व प्रसिद्ध कापड दुकानाला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आणि काही वेळातच आगीच्या प्रचंड ज्वाळांनी संपूर्ण दुकानाला वेढले.
या घटनेत दुकानातील लाखो रुपयांचा कापडसाठा जळून खाक झाला असून अग्निशमन विभागाच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास दुकानाच्या आतील भागातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला किरकोळ स्वरूपाचा वाटणारा हा प्रकार काही मिनिटांतच गंभीर बनला. दुकानाच्या आतून धुराचे मोठे लोट बाहेर पडू लागले आणि अचानक आगीच्या ज्वाळा उसळल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तत्काळ नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधला.
दरम्यान, आग लागल्याची बातमी बाजारपेठेत वाºयासारखी पसरली. अनेक व्यापारी आणि नागरिक घटनास्थळी जमा झाले. दुकानातील ज्वलनशील कापडामुळे आग झपाट्याने पसरत होती. बाजारपेठेतील बहुतांश दुकाने एकमेकांना लागून असल्याने आग शेजारील प्रतिष्ठानांपर्यंत पोहोचण्याची भीती निर्माण झाली होती. विशेषत: परिसरातील मोठी कपड्यांची शोरूम, रेडिमेड वस्त्रांची दुकाने आणि इतर व्यापारी प्रतिष्ठाने धोक्याच्या छायेत आली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू करत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. अरुंद बाजारपेठ, धुराचे लोट आणि मोठ्या प्रमाणातील कापडसाठा यामुळे आग विझविण्याचे काम आव्हानात्मक ठरत होते. जवळपास दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यांच्या तत्परतेमुळे आग इतर दुकानांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात आली.
या घटनेत दुकानातील मोठ्या प्रमाणातील कापड, तयार कपडे, फर्निचर, इलेक्ट्रिक साहित्य तसेच इतर व्यावसायिक साहित्य जळून खाक झाल्याचे सांगितले जात आहे. नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नसला तरी लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, मंगळवार हा बाजारपेठेतील अनेक व्यापाºयांचा साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याने अनेक दुकाने बंद होती. त्यामुळे परिसरात तुलनेने कमी गर्दी होती. अन्यथा ही घटना अधिक गंभीर ठरली असती, अशी प्रतिक्रिया व्यापाºयांनी व्यक्त केली. सुट्टीमुळे बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही बाब दिलासादायक मानली जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलिस, महसूल प्रशासन तसेच संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेनंतर बाजारपेठेतील व्यापाºयांनी दुकानांमधील अग्निसुरक्षा यंत्रणांची नियमित तपासणी, विद्युत यंत्रणांचे आॅडिट आणि अग्निशमन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली आहे. मुख्य बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.