भंडारा शहर देतोय आजारांना आमंत्रण!

गोवर्धन निनावे/भंडारा पत्रिका भंडारा : भंडारा शहरात सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठा व गटर पाईपलाईनच्या कामांमुळे शहरातील अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. विकासकामांच्या नावाखाली शहरातील विविध चौक, मुख्य मार्ग आणि गल्लोगल्ली मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून पावसाळ्याच्या तोंडावर ही परिस्थिती नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या खड्डयांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने डासांची उत्पत्ती वाढत असून शहर आजारांना आमंत्रण देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शहरातील चांदणी चौक, जलाराम चौक, शास्त्री चौक, गांधी चौक, राजीव गांधी चौक, मुस्लिम लायब्ररी परिसर, जे.एम.पटेल रोड, सरकारी दवाखाना रोड यासह अनेक भागांमध्ये पाणी व गटर पाईपलाईनचे काम सुरू आहे. या कामासाठी खोदण्यात आलेले खड्डे अनेक ठिकाणी उघडेच ठेवण्यात आले असून त्यामध्ये पावसाचे तसेच सांडपाण्याचे साचलेले पाणी दिसून येत आहे. पावसाळा सुरू होताच या खड्डयांमध्ये अधिक प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण निर्माण होत असून मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.

साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे वाहनचालक आणि पादचाºयांनाही मोठा त्रास होत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी किंवा पावसाच्या काळात हे खड्डे नजरेस न पडल्यास अपघात होण्याची शक्यता वाढते. अनेक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही सूचना फलक किंवा संरक्षक व्यवस्था नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. विकासकामे आवश्यक असली तरी त्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करणे आणि काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नागरिकांनी भंडारा नगर परिषद प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली असून साचलेल्या पाण्याचा निचरा करणे, डास नियंत्रणासाठी औषध फवारणी करणे तसेच खोदलेले खड्डे त्वरित बुजवून रस्ते पूर्ववत करावेत, अशी मागणी जोर धरत आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास आरोग्यविषयक समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टीने नगर परिषद प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीयार्ने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *