लाखादुरातील दिव्यांगांच्या साखळी उपोषणाची प्रशासनाच्या आश्वासनानंतर सांगता

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : दिव्यांगांच्या हक्कांचे संरक्षण, बंद झालेल्या शासकीय योजना व लाभ पूर्ववत सुरू करणे तसेच २७ मार्च २०२६ रोजीचा शासन निर्णय रद्द अथवा सुधारित करण्याच्या मागण्यांसाठी विकासगंगा दिव्यांग तालुकास्तरीय संघटना आणि विश्वास अपंग जन परिवार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालयासमोर आयोजित साखळी उपोषण आंदोलनाची मंगळवार, दि. १६ जून रोजी दुपारी ४ वाजता सांगता करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या आंदोलनाची सुरुवात संविधान पूजनाने करण्यात आली होती.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आंदोलनकर्त्यांनी सामाजिक न्याय, समानता आणि दिव्यांगांच्या घटनात्मक हक्कांच्या संरक्षणाचा निर्धार व्यक्त केला. यावेळी ‘दिव्यांगांना न्याय द्या’, ‘शासन निर्णय मागे घ्या’, ‘हक्क आमचे मिळालेच पाहिजेत’, अशा घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दुमदुमून गेला. संघटनेच्या पदाधिकाºयांनी सांगितले की, शासनाच्या २७ मार्च २०२६ च्या निर्णयामुळे तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या अनेक लाभार्थ्यांना शासकीय योजना, मानधन, प्रवास सवलती आणि इतर सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक दिव्यांगांना कायमस्वरूपी प्रमाणपत्र मिळण्यात विलंब होत असल्याने या निर्णयाचा सर्वाधिक फटका त्यांना बसत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दिव्यांगांचे सर्व लाभ पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनस्थळी भेट देत रयत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत यांनी दिव्यांगांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनीही आंदोलनात सहभागी होत शासनाने दिव्यांगांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज व्यक्त केली. तालुका युवक कॉग्रेस पाटीर्चे युवा अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनीही व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

विशेष म्हणजे, तालुक्याच्या विविध भागांतून आलेल्या शेकडो दिव्यांग बांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आंदोलनाला मोठे बळ मिळाले. दिव्यांगांच्या हक्कांसाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. दरम्यान, नायब तहसीलदार डी. के. धकाते आणि सहकारी मंडळ अधिकारी कौरवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन दिव्यांगांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. मुख्यमंत्री यांना पाठविण्यासाठीचे निवेदन स्वीकारून मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर दि. १६ जून रोजी दुपारी ४ वाजता दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाºयांना व उपस्थित आंदोलनकर्त्यांना लिंबूपाणी पाजून साखळी उपोषणाची सांगता करण्यात आली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *