
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर साकोली नगर परिषदेत आज विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया पार पडली. नगरपरिषदेत भाजपाकडे स्पष्ट बहुमत व एकहाती सत्ता असल्यामुळे विषय समिती सभापती पदासाठी दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन अर्जांना कोणताही विरोध झाला नाही. परिणामी सर्व विषय समित्यांची निवड ही अविरोध पद्धतीने पार पडली. नगराध्यक्षा देवश्री कापगते यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया शांततेत पार पडली. या निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम व नियोजन समितीच्या सभापतीपदी किशोर पोगडे, स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी प्रीती डोंगरवार, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी नयन पटेल यांची अविरोध निवड करण्यात आली. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी नगरपरिषदेच्या उपाध्यक्षा रोहिणी मुंगुलमारे, तर उपसभापतीपदी स्मिता सिडाम यांची निवड करण्यात आली.
सर्व नवनिर्वाचित सभापतींचे नगर परिषदेतर्फे अभिनंदन करण्यात आले. विषय समिती सभापतींची निवड पूर्ण झाल्यामुळे आता शहराच्या सर्वांगीण विकास प्रक्रियेला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक सुविधा, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच महिला व बालकल्याण या महत्त्वाच्या विषयांवर प्रभावी निर्णय घेऊन नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याची जबाबदारी आता संबंधित सभापतींवर आहे. आपापल्या विभागातील कामकाज किती तत्परतेने व प्रभावीपणे पार पाडले जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या विषय समिती निवडणुकीचे कामकाज पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी निलेश कदम यांनी पार पाडले. शहरातील जनतेकडून सत्ताधारी वर्गाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात असून, नवनिर्वाचित सभापतींच्या माध्यमातून साकोली शहराच्या विकासाला नवे आयाम मिळतील, अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत.