
तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील मांडेसर येथील सूरज बिरणवार या अभियांत्रिकीच्या विद्याथ्यार्ने २३ फेब्रुवारी रोजी साकोली येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.मात्र या घटनेला तीन महिन्यांहून अधिक कालावधी लोटल्यानंतरही मृत्यूमागील कारणे स्पष्ट झाली नसल्याचा आरोप करत मृतकाच्या नातेवाईकांनी मोहाडी येथील शासकीय विश्रामगृहात वार्ताहर परिषद घेऊन तपासाला गती देण्याची मागणी केली. यावेळी मृतकाचे वडील नरेश बिरणवार यांच्यासह हावसू बिरणवार,कला बिरणवार,तरासन बिरणवार व सुरेश बिरणवार,विलास वाडीभस्मे उपस्थित होते. सूरज हा साकोली येथे अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. त्याला काही व्यक्तींकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा संशय असून त्याच दबावातून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा दावा नातेवाईकांनी केला.
घटनेनंतर अनेकदा साकोली पोलीस ठाण्यात जाऊन चौकशी केली. मात्र तपासाची दिशा, संशयितांची चौकशी अथवा अन्य महत्त्वाच्या बाबींबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांच्या मनातील शंका आणखी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.या प्रकरणातील संबंधित व्यक्तींच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्डची (सीडी आर) तपासणी करून आत्महत्येस कारणीभूत असलेल्या व्यक्तींचा शोध घ्यावा,अशी मागणी करण्यात आली. तसेच ५ जून रोजी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर करण्यात आले असून वरिष्ठ अधिकाºयांनी स्वत: लक्ष घालून तपासाची गती वाढवावी व सत्य समोर आणावे,अशी मागणी नातेवाईकांनी वार्ताहर परिषदेत केली.