
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नाकाडोंगरी:- सीतासावंगी येथील र-ि हवासी अरुण बालकृष्ण घडले (वय ५६), मॉइल कर्मचारी यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मॉइल लिमिटेडच्या चिखला प्रकल्पातील रुग्णालयात घडल्याची माहिती मिळाली आहे. माहितीनुसार, अरुण घडले यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने वाहनातून मॉइल रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्यावेळी रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाला वाहनातून खालीही उतरवण्यात आले नाही, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच रुग्णालयात आवश्यक आॅक्सिजनची सोयही उपलब्ध नव्हती, असा दावा नातेवाईकांनी केला असून, वेळेवर उपचार व आॅक्सिजन मिळाला असता तर जीव वाचला असता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे सीतासावंगी व चिखला परिसरात संतापाची लाट उसळली आहे. संबंधित जबाबदार अधिकाºयांवर कठोर कारवाई करून रुग्णालयात २४ तास डॉक्टर व आपत्कालीन सुविधा उपलब्ध ठेवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या प्रकरणी मॉइल प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही.