
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी बेला : बेला येथे मैत्रीया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन वाचनालयातील अभ्यासकांनी स्वत: पुढाकार घेऊन केले. अभ्यासकांनी महाराजांच्या कार्याचा सर्वांगीण आढावा घेत त्यांच्या पराक्रम, लोकाभिमुख राज्यकारभार आणि आधुनिक युगासाठी त्यांच्या विचारांची आवश्यकता यावर प्रभावीपणे विचार मांडले. यावेळी गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाचा संदर्भ देत शिवाजी महाराजांची सर्वसमावेशक, धर्मनिरपेक्ष आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणारी प्रतिमा अधोरेखित करण्यात आली.
अभ्यासकांनी नमूद केले की शिवाजी महाराज हे केवळ एका समाजाचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे प्रतिपालक होते. त्यांनी शेतकरी, कष्टकरी, स्त्रिया आणि सर्वसामान्य जनतेच्या सन्मानाचे राज्य उभारले. अभ्यासक म्हणाले,”छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी केवळ इतिहासातील व्यक्ती नाहीत, तर ते एक जिवंत प्रेरणास्रोत आहेत. त्यांचे ध्येय, शिस्त, स्वराज्याची संकल्पना आणि नेतृत्वगुण आजच्या तरुणाईने आत्मसात करण्यासारखे आहेत.” मैत्रीया फाउंडेशन ही संस्था २०२५ पासून कार्यरत असून शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे, उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन करणे व सामाजिक बांधिलकी जोपासणे यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. सदर कार्यक्रमास मैत्रीया फाउंडेशन व स्थानिक अभ्यासकांचा विशेष सहभाग लाभला आणि कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.